कोरोना काळात लोकांच्या देवावरील श्रद्धेत वाढ झाल्यासारखे दिसले. खरंतर या महामारीवर काहीच तोडगा नसल्यामुळे बऱ्याच जणांनी सर्वकाही नशिबावर सोडले होते. अनोळखी विषाणू आपल्यावर आघात करू नये अशी देवाकडे प्रार्थना करण्यावाचून गत्यंतर नव्हते. ती श्रद्धा की अंधश्रद्धा यावर यावर कोणीही ठामपणे मत व्यक्त करू शकणार नाही हे सत्य आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फार अस्पष्ट अशी रेषा आहे. श्रद्धेची कधी अंधश्रद्धा होईल हे सांगता येत नाही.
अंधश्रद्धेवर आधारित 'परीस' ही सस्पेन्स थ्रीलर असलेली वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित होणार आहे. सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो? त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या सिरीजमधून मिळणार आहेत. संवाद, दिग्दर्शन, छायाचित्रण,कलाकार यांची एक उत्तम भट्टी या वेबसिरीजमध्ये जमून आल्याचे ट्रेलर मधून दिसते. या वेबसीरिजचे छायाचित्रण सोपान पुरंदरे यांनी केले आहे.
भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर वेबसीरिजची निर्मिती करणे हे ‘प्लॅनेट मराठी’चे धाडसी आणि तेवढेच कौतुकास्पद पाऊल म्हणावे लागेल. या वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे.