मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकची तयारी करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने या चित्रपटाबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली होती. आता तिने या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटातील भूमिका आपल्यासाठी आव्हानात्मक असल्याचे परिणीतीने म्हटले आहे. तिच्या फर्स्ट लूकमध्येही याची झलक पाहायला मिळते.
अलिकडेच परिणीती आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी असलेला 'जबरिया जोडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अल्पसा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाच्या कमाईत फारशी भर पडली नाही. मात्र, आता 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटातून परिणीती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'जे कधीच केले नाही, असे काही.. माझ्या करिअरमधली सर्वात कठिण भूमिका', असे कॅप्शन परिणीतीने या फोटोवर दिले आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन' हा चित्रपट २०१५ साली आलेल्या कादंबरीवर आधारित आहे. हॉलिवूडमध्ये या चित्रपटाला दमदार यश मिळाले होते. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. परिणीतीसोबत अभिनेत्री क्रिती कुल्हारी हिदेखील या चित्रपटात झळकणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.