कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना टेलिव्हिजनवर नवनवीन कार्यक्रम येताना दिसताहेत. त्यात गाजलेल्या रियालिटी शोजच्या पुढील सिझनचाही समावेश आहे. झी मराठीवरील लोकप्रिय संगीत रियालिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ घेऊन येत नवीन सिझन. सारेगमप म्हणजे सुरीली मैफिल आणि झी मराठीने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना या सुरील्या मैफिलीत गेली अनेक वर्ष दंग करून ठेवले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम प्रेक्षकांचा खास आवडता आहे. या कार्यक्रमातील छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आणि या पर्वातही त्याची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा नक्कीच आहे. परंतु या शो चे मेकर्सना मात्र विश्वास आहे की सारेगमप लिटिल चॅम्प्स चा हा सीझनही प्रेक्षकांना भरपूर आवडेल.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या आधीच्या पर्वाला प्रेक्षकांचा मिळालेला भरगोस प्रतिसाद आणि कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून झी मराठी तब्बल १२ वर्षांनी लिटिल चॅम्प्सच नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. इतकंच नव्हे तर प्रेक्षकांचे लाडके ‘पंचरत्न’ या नवीन पर्वात या छोट्या गायक मित्रांचे ताई दादा म्हणजेच ज्युरीच्या भूमिकेत दिसतील. गेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या पर्वातील ‘पंचरत्न’ म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे यांनी संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली.
या नवीन पर्वाच्या निमित्ताने नुकतीच या लिटिल चॅम्प्सची ऑनलाईन शाळा भरली होती, ज्यात पत्रकार मित्रांचा देखील सहभाग होता. त्याचसोबत या कार्यक्रमाची झलक म्हणून काही स्पर्धकांनी गाणी देखील गायली. या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मृण्मयी देशपांडे हिने या पाचही पंचरत्नांचं मनोगत जाणून घेतलं. पंचरत्नांनी या नवीन पर्वाबद्दल आपले विचार मांडले. मृण्मयी आणि पंचरत्नांनी शूटिंग दरम्यानचे काही खास किस्से देखील सांगितले.