मुंबई -वकील म्हणजे न्यायप्रणालीचा एक चेहरा असतो. एक वकील म्हणून प्रख्यात विधीतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. 'ओह माय गॉड' चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'निकम' असे या बायोपिकचे नाव असणार आहे.
'निकम' या बायोपिकमध्ये उज्वल निकम यांच्या करिअरमधील महत्त्वाच्या घडामोडी पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत. उमेश शुक्ला यांच्यासोबतच सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
या बायोपिकबाबत बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, की 'मागील बऱ्याच दिवसांपासून मला माझ्या आयुष्यावर पुस्तक किंवा चित्रपट तयार करण्यासाठी विचारणा करण्यात येत होती. याबद्दल मी आश्वासक नव्हतो. कारण, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मात्र, प्रतिभाशाली टीमसोबत जुळून अखेर मी या बायोपिकसाठी तयार झालो. मला या टीमवर विश्वास आहे. ते या बायोपिकला योग्य तो न्याय देतील'.