मुंबई - मनुष्याच्या आयुष्यात कोरोनाने भरपूर बदल केले. या महामारीच्या काळात अनेकांना अनेक अनोखे आणि विचित्र अनुभव आले. अशाच काही अनुभवांवर आधारित काही शॉर्ट फिल्म्स बनल्या आहेत ज्या अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘अनपॉझ्ड: नया सफर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याच्या अलीकडेच लाँच झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अमेझॉन ओरिजिनल्समध्ये पाच हिंदी लघुपट दाखवले जाणार असून, प्रत्येक लघुपट कोरोना महामारीमुळे आलेल्या आव्हानांमध्ये कसे वागावे हे प्रेक्षकांना गुंतवून ठेवत सांगेल. या कथा सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याच्या गरजेवरही भर देतात. पाच प्रतिभावान दिग्दर्शक अशा कथा घेऊन आले आहेत ज्या प्रेक्षकांना थक्क करून सोडतील.
'अनपॉज्ड: नया सफर' अशा पाच अनोख्या कथा आपल्यासाठी घेऊन येत आहे ज्या, आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र, शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे.