मुंबई - छोट्या पडद्यावरीर 'लागीर झालं जी' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला निखिल चव्हाण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखिलच्या अभिनयक्षेत्राचा आलेख दिवसागणिक उंचावतच चालला आहे. चित्रपट, नाटक, मालिका, वेबसिरिजचा एकामागून-एक धडाका लावणारा निखिल आता एका लव्ह स्टोरीचा हिरो म्हणून लवकरच आपल्या समोर येणार आहे. 'धोंडी चंप्या- एक प्रेमकथा' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'धोंडी चंप्या' चित्रपटात निखिलसोबत अभिनेत्री सायली पाटील ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया' मालिका 'बॉईज २' चित्रपट आणि 'स्त्रीलिंग-पुल्लिंग' वेबसिरीजमध्ये सायली झळकली होती. आता सायली आणि निखिल पहिल्यांदाच मुख्य जोडी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
'कॉमेडी एक्स्प्रेस', 'गोलमाल' यांसारखे कार्यक्रम आणि सिनेमाचे दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर हे 'धोंडी चंप्या' चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत
निखिल चव्हाणच्या 'झी ५' वरील 'वीरगती' तर शुद्ध देसी मराठी ची 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या वेबसीरीज अलीकडेच प्रचंड गाजल्या. त्याने आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 'धोंडी चंप्या' चित्रपटात तो प्रथमच मुख्य भूमिका साकारणार आहे. शिवाय हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट असल्यामुळे रसिकांना निखिलच्या अभिनयाचा आणखी एक पैलू पाहायला मिळेल. विशेष म्हणजे या चित्रपटात विनोदवीर वैभव मांगले आणि भरत जाधव हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
असे आहे कथानक -
'धोंडी चंप्या'ची प्रेमकथा म्हणजे एका म्हैस आणि रेड्याच्या अनुषंगाने उलगडते. एका गावातील तालेवार बागायतदार उमाजी आणि अंकुश यांच्यात चालत आलेल्या परंपरागत वैराचा फटका धोंडी आणि चंप्याला बसतो. उमाजी म्हणजेच भारत जाधव आणि अंकुश म्हणजेच वैभव मांगले यांच्या मुलांच्या भूमिकेत निखिल आणि सायली दिसतील. वडीलांप्रमाणे भांडता-भांडता निखिल आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि प्रेमाचा लपंडाव सुरू होतो.
भरत जाधव आणि वैभव मांगले या दोघा अभिनेत्यासोबत काम करण्याचा निखिल आणि सायलीचा पहिलाच अनुभव आहे. धोंडी आणि चंप्याची प्रेमकथा सफल करण्यात निखिल आणि सायली यशस्वी होतात का, हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.