महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नात्यांची वीण घट्ट करणारी मालिका, 'जीव माझा गुंतला'! - कलर्स मराठीवर 'जीव माझा गुंतला'!

'जीव माझा गुंतला' ही नवी मालिका अंतरा आणि मल्हार यांच्या रागड्या प्रेमाची गोष्ट आहे. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे तिच्यासोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर? असा कुठला नात्यांचा गुंता उद्भवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो. या द्वेषाची जागा प्रेम घेऊ शकेल? कसा रंगेल या कहाणीचा करार? या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहे ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका.

'Jeev Mazha Guntala'
'जीव माझा गुंतला'!

By

Published : Jun 18, 2021, 4:19 PM IST

प्रेम हा विषय वैश्विक आहे आणि अनादी काळापासून यावर कथा, नाटकं, चित्रपट बनत आलेत. मालिकांतूनही प्रेम हाच मुख्य विषय असतो. परंतु काहीही झालं तरी प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात त्यामुळेच हा विषय अनेकविध तऱ्हेने मांडता येतो. प्रेमातील भावना कधी आनंदी असतात, कधी सुखकर असतात, कधी आल्हाददायक असतात तर कधी प्रेमाला रांगडा बाज असतो कारण ते पहिल्या नजरेत जुळलेलं किंवा फुलू लागलेलं प्रेम असेलच असं नाही. काहीवेळा प्रेमाची परिभाषा कळायला काही काळ जावा लागतो. ज्या व्यक्तीसोबत आपले विचार जुळत नाहीत, भांडणं होतात त्या व्यक्तीवर प्रेम जडू शकत नाही असं काही नसतं. अगदी तसंच आयुष्याचाही समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं असणं हीदेखील सहजीवनाची गरज असते.

सध्या अनेक मालिकांमधून शहराबाहेरील छोट्या छोट्या गावातील प्रेमकथांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तिथल्या प्रेमात एक रांगडा बाज असतो आणि मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार, 'जीव माझा गुंतला' या नव्या मालिकेतून, जी कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे तिच्यासोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर? असा कुठला नात्यांचा गुंता उद्भवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो. या द्वेषाची जागा प्रेम घेऊ शकेल? कसा रंगेल या कहाणीचा करार? या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहे ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका ज्याची निर्मिती केलीय टेल-अ-टेल मिडीयाने.

प्रत्येकाच्या आयुष्यात नात्यांना असीम महत्व असते. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते.

दुसरीकडे श्रीमंत व्यावसायिक मल्हार आईचा लाडका. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.

मालिकेचे निर्माते महेश तागडे म्हणाले, “कोरोनाच्या कठीण काळातसुद्धा मनोरंजन थांबलेलं नाही. सगळ्या नियमांचं पालन करत, प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही कलर्स मराठी वाहिनीसोबत नव्या जोशाने तयार आहोत. टेल-अ-टेल मिडीयाने घाडगे & सून ह्या संकल्पनेसोबत कलर्स मराठी वाहिनीच्या मदतीने घवघवीत यश मिळवलं. या यशाच्या वाटचालीसोबतच आम्ही आता पुन्हा सज्ज झालोय एक नवी मालिका घेऊन. एका आगळ्या वेगळ्या कल्पनेसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. टेल-अ-टेल मिडिया निर्मित “जीव माझा गुंतला” ही घरातली धाकटी मुलगी जी रिक्षा चालवून आपल्या घराचा सांभाळ करते, अशा अंतराची विधिलिखित प्रेमकहाणी असणारी मालिका आहे”.

मालिकेबद्दल बोलताना, मराठी टेलिविजन प्रमुख, (वायाकॉम18) दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “नात्यांच्या विविध पैलूंवर विचार करून आणि नात्यातील अनोखी बाजू मनोरंजनातून आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतोच. आपण सगळे जवळपास दीड वर्ष भीषण अशा महामारीशी लढतो आहे. ह्या संकटकाळी खरी परीक्षा आहे ती आपल्यातील नाते संबंधांची. नात्यांची विविध रूपं या काळात आपण अनुभवली. मनोरंजन हे अत्यंत सशक्त माध्यम आहे. काही क्षणांचा विरंगुळा मनाला उभारी देतो. ग्रामीण महाराष्ट्राच्या पाश्वर्भूमीवर आधारित 'जीव माझा गुंतला' मालिका एका सुंदर नात्याची वीण घालणार आहे. या मालिकेची मांडणी आणि चित्रीकरणामुळे प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल. मालिकेद्वारे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुभवी कलाकारांचा संच, अनोखी कथा, वैशिष्टयपूर्ण चित्रीकरण स्थळं यामुळे आम्ही आशा करतो की मालिका प्रेक्षकांना आवडेल.”.

मालिकेचे लेखक जिंतेंद्र गुप्ता म्हणाले, “प्रत्येक कथेला वेगळेपण त्या कथेतली पात्रं देतात. त्या पात्रांमुळे ती गोष्ट लोकांच्या स्मरणात राहते. कथेपेक्षा त्या कथेतील पात्रं लोकांच्या मनात घर निर्माण करतात. जगाभरातली कोणतीही लोकप्रिय कथा असो मग ते महाभारत असो किंवा कोणत्याही स्वरूपात लिहिली गेलेली कथा. 'जीव माझा गुंतला' ही अशीच दोन वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाकांक्षी व्यक्तींची गोष्ट आहे. जे महत्वाकांक्षी तर आहेतच पण त्यासोबत आपल्या आसपासचे वाटावेत असे आहेत. कलर्स मराठीने यावेळेस वेगळी अशी कथा प्रेक्षकांना देण्याची संधी आम्हाला दिली आहे. या मालिकेचा लेखक आणि निर्माता म्हणून हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे पण टेल-अ-टेल मिडीया, अशाच आव्हानात्मक कामांमध्ये यश मिळवणारी निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते. मालिकेसाठी नव्या कथा आणि त्यातली पात्रं हेच आमचं वैशिष्ट्य राहिलंय.”.

नवीन मालिका, 'जीव माझा गुंतला' २१ जूनपासून कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

ABOUT THE AUTHOR

...view details