मुंबई - घरातली बायकोच ऑफिसमध्येसुद्धा बॉस असेल तर नवऱ्याची काय परिस्थिती होईल याचा विचारच केलेला बरा. परंतु असा विचार घेऊन एक मालिका दाखल होतेय , जिचं नाव आहे, 'बॉस माझी लाडाची'.
एक नवी कोरी मालिका सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'बॉस माझी लाडाची' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांना दररोज रात्री ही मालिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि नवोदित अभिनेता आयुष संजीव हे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गिरीश ओक, रोहिणी हट्टंगडी, माधवी जुवेकर हे नावाजलेले कलाकारही या मालिकेत आहेत.
या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. भाग्यश्रीने याआधीही आपल्या अभिनयाने आणि निरागसतेने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण या वेळी मात्र ती एका ‘कडक’ बॉसच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आयुष संजीव हा मालिकेत मुख्य भूमिका पहिल्यांदाच साकारतो आहे. या मालिकेद्वारे ऑफिसमधली धमाल प्रेमकहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.