महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्त्रियांचा स्वत:बद्दल आणि पुरुषांचा स्त्रियांबद्दलचा दृष्ष्टीकोन बदलणारी मालिका, ‘बायको अशी हव्वी’! - कलर्स मराठी वाहिनीवर ‘बायको अशी हव्वी’

महाराष्ट्रात शुूटिंग्सना बंदी केल्यामुळे अनेक मराठी मालिकांचे शुटिंग्स राज्याबाहेर होत आहेत. प्रेक्षकांना नवीन एपिसोड्स दाखवण्यासाठी निर्माते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच कलर्स मराठी वाहिनीवर ‘बायको अशी हव्वी’ नावाची एक नवीन मालिका येऊ घातली आहे.

'Baiko Ashi Havvi' on Colors Marath
कलर्स मराठी वाहिनीवर ‘बायको अशी हव्वी’

By

Published : May 12, 2021, 6:29 PM IST

या वर्षीच्या सुरुवातीला कोरोना परिस्थिती सुधारत आहे असे वाटत असताना टेलिव्हिजन मालिका निर्मात्यांनी नवीन प्रोजेक्ट्स सुरु करायला सुरुवात केली होती. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्राळविक्राळ रूप घेतले. पुन्हा जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे बरेचशे लोक घरीच बसून असून त्यांच्या मनोरंजनाची भूक टेलिव्हिजन मालिका भागवत आहेत. महाराष्ट्रात शुटिंग्सना बंदी केल्यामुळे अनेक मराठी मालिकांचे शुटिंग्स राज्याबाहेर होत असून त्यांनी प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समधून रिझवत ठेवले आहे. त्यातच कलर्स मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका येऊ घातली आहे, ‘बायको अशी हव्वी’ नावाची.

कुटुंबात अधिकार पुरुषाचाच अशी आपली पारंपरिक विचारसरणी. खरंतर संसाररथाचा तोल सावरला जातो तो स्त्रीमुळेच. प्रत्येक कुटुंबाला पूर्णत्त्व येतं ते स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे. घराला घरपण हे तिच्यामुळेच असते. उपवर मुलगी संसाराचं सुंदर स्वप्न घेऊन सासरी येते, साखर पाण्यात जशी सहज विरघळावी तशी संसारात मिसळून ती गोडवा आणते. ती हे सगळं निरपेक्षपणे पार पाडत असते पण त्या बदल्यात तिच्या वाट्याला काय येतं. सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवर्‍याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल. याच धाग्याला घेऊन कलर्स मराठी घेऊन येत आहे नवीकोरी मालिका ‘बायको अशी हव्वी’.

खरंतर संसार दोघांचा असतो. पण अपेक्षा मात्र फक्त मुलीकडून असतात. या सगळ्यामध्ये मुलीला गृहित धरलं जातं, पुरुषांनी आखून दिलेल्या कुंपणात तिला जगावं लागतं. जुन्या विचारांचं कुंपण तोडून, खर्‍या अर्थाने जोडीदारासोबत संसाराचं नवं चित्र उभ्या करू पाहणार्‍या एका मनस्वी नायिकेची कथा म्हणजे आमची नवी मालिका “बायको अशी हव्वी”. या मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन व दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे.

एक चित्र असं की भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ मानलं जातं. त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे. बाहेरून बघता राजेशिर्के एक आदर्श कुटुंब आहे. पण घरातलं आतलं चित्र मात्र या विरुध्द आहे. पुरूषांचे वर्चस्व घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आले आहे आणि बायकांनी उबरंठा ओलांडायचा नाही, चूल आणि मूल याच काय त्या बायकांच्या जबाबदार्‍या अशी त्यांची विचारसरणी आहे. घरातील स्त्रियांच्या म्हणण्याला काडीमात्र महत्त्व दिले जात नाही, त्यांची इच्छा जाणून घेतली जात नाही आणि यामध्ये बायकांची घुसमट होत आहे. घरातील बायका हे निमूटपणे सहन करत आहेत. पुरुषी अहंकाराला जपत आहेत.

दुसरं चित्र संपूर्ण याउलट. एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंब जे स्त्री-पुरुष असा भेदभाव अजिबात मानत नाही अशा घरात वाढलेली आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? विभास आणि जान्हवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत होतं? यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? संसाराबद्दल या दोघांचीही मतं वेगळी आहेत. त्यांची मनं जुळतील? हा प्रवास पाहणं रंजक असणार आहे. स्त्री शिवाय कुटुंब नाही, संसार नाही, पण, तरीही तिला तितकंसं महत्त्व कुटुंबात मिळत नाही आणि याचा अनुभव जान्हवीला राजेशिर्केंच्या घरी येणार आहे. जान्हवी तिच्या गोड स्वभावाने कसे त्यांचे मतपरिवर्तन करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख, मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून वैविध्यपूर्ण विषयांवरील मालिका आम्ही रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. या मालिकांना भरभरून प्रेम देखील मिळत आहे. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका. आपल्याकडे अनेक वर्षांपासून लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे, कुटुंबाचा सांभाळ तुलाच करायचा आहे असं मुलींना सांगितलं जातं. स्त्री -पुरुष हे कुटुंब व्यवस्थेतेतले अत्यंत परस्परपूरक घटक आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे असलेच पाहिजे. स्त्री बायको असो, बहीण असो, आई असो तिला तिचा मान मिळायलाच हवा. या मालिकेमुळे स्त्रियांचा स्वत:बद्दल आणि पुरुषांची स्त्रियांबद्दल विचार करण्याच्या दृष्टीकोनात बदलाची प्रक्रिया सुरु करायचा नव्याने प्रयत्न करेल”.

मालिकेचे लेखक - दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, समंजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्‍य पुरुषांचा स्त्रि‍यांकडे बघण्‍याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं. लग्‍न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्‍हणजे स्‍वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्‍य ध्‍येय असावं हे पाहिलं जातं. हे ध्‍येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयि‍स्‍कर दुर्लक्ष केलं जातं. अजूनही बाईची कर्तव्‍य आणि पुरुषाची कर्तव्‍य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं. या मुखवटयाचं, मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रि‍यांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्‍ट आहे”.

कोरी करकरीत नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ १७ मेपासून प्रसारित होणार आहे कलर्स मराठीवर.

हेही वाचा - तारक मेहता...'मधील 'टप्पू'च्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details