मुंबई - कोणत्याही चित्रपटातल्या नव्या जोड्यांची नेहमीच चर्चा होत असते. एखादी नवी जोडी येणार असेल तर, प्रेक्षकांनाही त्या जोडीची उत्सुकता असते. मोनल गज्जर, ऋत्विज वैद्य ही अशीच एक नवी जोडी 'मन उधाण वारा' या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. येत्या ११ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गुजराती कौटुंबिक पार्श्वभूमी असललेली मोनल आणि मध्यप्रदेशातल्या भोपाळ मध्ये शिकलेला ऋत्विज यांचा मराठीशी तसा फारशा संबध नसल्याने 'मन उधाण वारा' हा चित्रपट त्यांच्यासाठी एक आव्हान होते. मोनलने याआधी गुजराती, तामिळ, तेलगू, अशा बऱ्याच भाषांमध्ये काम केलं आहे. तर, ऋत्विजने अनेक हिंदी लघुपटांचे दिग्दर्शन तसंच त्या लघुपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे. या दोघांचे काम पाहिल्यानंतर निर्माते सतीश कौशिक यांनी या दोघांची निवड चित्रपटासाठी केली.
आपल्या या अनुभवाबद्दल बोलताना मोनल आणि रित्विज सांगतात की, 'आम्ही नेहमीच आशयसंपन्न भूमिकांना प्राधान्य दिल्यामुळे सतीशसरांनी आम्हाला या भूमिकेबद्दल विचारल्यानंतर आमच्यासाठी ही निश्चितच आनंदाची बाब होती. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा चित्रपट असून ‘फ्रेश जोडी’ ही या चित्रपटाची गरज होती. त्यानुसार या चित्रपटासाठी आमची निवड झाली. आमच्या केमिस्ट्री बाबत विचाराल तर दोघंही एकमेकांना तसे नवखे असलो, तरी या कला माध्यम आमच्यासाठी नवे नाही. त्यामुळे एकत्र काम करताना मजा आली.
दिग्दर्शक संजय मेमाणे यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला आमच्या भूमिका समजावून सांगितल्याने एकमेकांच्या कृतीला मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर उत्तम जुळला होता. प्रेक्षकांनाही चित्रपटात आमचा हा जुळलेला सूर नक्कीच दिसेल. तसेच अनुभवी कलाकारांबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं'.