महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवकलाकारांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘चित्र मराठी' या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा!

मंदार काणे आणि समीर पौलस्ते या नाट्यक्षेत्राशी जुळलेल्या तरुणांनी मराठी भाषिक कन्टेन्ट साठी एका नवीन ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. ‘चित्र मराठी’ या नवीन आणि फक्त मराठी कन्टेन्टसाठी असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे उदघाटन जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले. ‘चित्र मराठी’चे घोषवाक्य आहे, ‘मनोरंजन घराघरात, मनोरंजन मनामनात’.

Rajdutt inaugurates 'Chitra Marathi' OTT
राजदत्त यांच्या हस्ते ‘चित्र मराठी’ ओटीटीचे उद्घाटन

By

Published : Aug 14, 2021, 3:04 PM IST

कोरोना महामारीमुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मनोरंजनसृष्टीलाही टाळे लागल्यागत होते. सर्व प्रकारच्या शूटिंग्सवर बंदी असल्यामुळे मनोरंजनासाठी लोकांनी ओटीटी ची कास धरली. खरंतर इतर ठिकाणी नुकसानी दिसत असताना ओटीटी प्लॅटफॉर्म्सना मात्र सुगीचे दिवस आले होते. वेगळ्या दृष्टिकोनातून आणि आशयघन विषय घेऊन हे ओटीटी प्लॅटफॉर्म कायमच तत्पर असतात. परंतु मराठी कन्टेन्टला म्हणावे तसे प्रतिनिधित्व देणारे प्लॅटफॉर्म्सच नव्हते. त्यामुळे मंदार काणे आणि समीर पौलस्ते या नाट्यक्षेत्राशी जुळलेल्या तरुणांनी मराठी भाषिक कन्टेन्ट साठी एका नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म ची घोषणा केली आहे. ‘चित्र मराठी’ या नवीन आणि फक्त मराठी कन्टेन्टसाठी असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे उदघाटन जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले. ‘चित्र मराठी’चे घोषवाक्य आहे, ‘मनोरंजन घराघरात, मनोरंजन मनामनात’.

आताच्या घडीला ओटीटी प्लॅटफॉर्म रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. मनोरंजन दुनियेतील ओटीटी हा एक प्रमुख घटक बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कलाकारांना घेऊन प्रेक्षकांच्या सेवेस तत्पर अशा आता नव्या रूपात भेटीला आलेला हा ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अध्यात्म असा बराच कंटेन्ट या प्लॅटफॉर्मवर हाताळला जाणार आहे. कलाकारांना सोबत घेऊन रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुरुवातीला एक नव्हे दोन नव्हे तर दहा वेबसिरीज येथे प्रदर्शित करण्यात येणार आहे.

या चित्र मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्रमुख, संस्थापक मंदार काणे म्हणाले, 'प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट आणि आशयघन विषय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. लॉकडाऊनच्या काळात नवकलाकारांना उभे राहण्याची संधी कुठेतरी धूसर झाली. याच नवकलाकार आणि प्रतिभावान कलाकारांना उभारी देण्यासाठी हा नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही येत आहोत. याशिवाय खेड्यापाड्यातील प्रतिभावान मुलांना पुढे आणण्यासाठी हा ओटीटी प्लॅटफॉर्म बांधील राहणार आहे. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन तुमच्या भेटीला येऊ.’

तसेच चित्र मराठीचे सह संस्थपाक समीर पौलस्ते एकूणच या प्लॅटफॉर्म बद्दल बोलताना असे म्हणाले की, 'लोककलेला प्रोत्साहन देणे आणि दिग्गज व नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मानस आहे. शिवाय आपल्या मराठी चित्रपटसृष्टी डिजिटल व जागतिक पातळीवर पोहोचायला हवी हा एकमेव उद्देश्य घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालो आहोत. नवनवीन आशयघन विषय तुमच्या भेटीला आणू आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी मी आशा करतो'.

नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या संकल्पनेला आणि कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी या सोहळ्याला दिग्दर्शक राज दत्त आणि अभिनेते जयंत सावरकर यांनी उपस्थिती दर्शवून चित्र मराठी प्लॅटफॉर्मचे संस्थापक मंदार काणे आणि सह संस्थापक समीर पौलस्ते यांच्यासह 'चित्र मराठी' या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण केले. 'मंदार काणे एंटरटेनमेंट' आणि 'स्पार्कल्स९ मीडिया' निर्मित चित्र मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली असून नुकतेच याचे नाव आणि लोगो अनावरण सोहळा दिमाखात पार पडला.

हेही वाचा - ‘जॉबलेस’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ABOUT THE AUTHOR

...view details