डान्स रियालिटी शो 'सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये या विकेंडला येणार आहेत गतकालीन सुप्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग कपूर. नीतू कपूर यांनी बालवयातच सिनेमांत कामं करायला सुरुवात केली होती. खरंतर बॉलिवूडमध्ये जे बालकलाकार म्हणून प्रसिद्ध होते ते पुढे मोठेपणी तितकी प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. परंतु नीतू सिंग यांनी ती परंपरा खंडित केली आणि हिरॉईन म्हणूनसुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळविली. अभिनेता ऋषी कपूरसोबत विवाह झाल्यावर नीतू कपूर यांनी अभिनय संन्यास घेतला होता.
या वीकएंडला 'सुपर डान्सर चॅप्टर ४' चे स्पर्धक नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करतील आणि आपल्या डान्स स्टाइलमधून या ज्येष्ठ अभिनेत्रीला मानाचा मुजरा करतील. स्पर्धक परी आणि तिचा सुपर गुरु पंकज थापा यांनी ‘छू कर मेरे मन को’ या नितू कपूरच्या गाजलेल्या गाण्यावर परफॉर्म केले आणि आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच थक्क करून सोडले. परीच्या त्या भावनाप्रधान परफॉर्मन्सने नितू कपूर अवाक झाल्या. इतके भावनाप्रधान गाणे या दोघांनी आपल्या परफॉर्मन्सने किती गोड केले हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
'सुपर डान्सर चॅप्टर ४' मधील पाच वर्षाची स्पर्धक परीचा परफॉर्मन्स बघितल्यावर त्या भूतकाळात गेल्या. परीचा ॲक्ट बघितल्यानंतर नितू कपूर यांनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी केलेल्या पहिल्या शूटिंगचा अनुभव सांगितला. इतक्या कोवळ्या वयात परीचे अप्रतिम नृत्य कौशल्य पाहून नितू कपूरने एक आठवण सांगितली जेव्हा त्या स्वतः पाच वर्षांच्या होत्या आणि ‘सूरज’ चित्रपटासाठी त्यांनी पहिला शॉट दिला होता. त्यांना डोंगरावर पळत जायचे होते परंतु रिटेक्स वर रिटेक्स झाले आणि सारखे वरखाली धावल्यामुळे त्यांचे कोवळे पाय सोळातून निघाले होते. त्या म्हणाल्या की हा शूटिंगचा पहिला अनुभव फारसा चांगला नव्हता.