सोलापूर : बालगंधर्व यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर आणि सिद्धा पाटील स्मृती समिती,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे दि.१५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. सोलापुरातील नामवंत कलावंत प्रशांत देशपांडे, संध्या जोशी,दीपक कलढोणे,नितीन दिवाकर या कलावंतांच्या नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम यु-ट्युब वरून सादर केला जाणार असून त्यानंतर सदर कार्यक्रमाची लिंक व्हॉट्सअपसह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरून पाठवली जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूर यांच्या कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये सर्वांनींच डिजिटल माध्यमांद्वारे नाट्यसंगीताच्या कार्यक्रम करण्याला होकार दिला. या बैठकीच्या सुरुवातीला कलाक्षेत्रातील जेष्ठ नामवंत कवी मधुकर जोशी, अपर्णा रामतीर्थकर, अशोक सुरतगावकर, कमल ढसाळ, सुनील कोळी, इरफान खान, ऋषी कपूर, अरुण वैद्य, रत्नाकर मतकरी, उत्तम चौगुले, रामचंद्र धुमाळ, कवी योगेश, वाजिद(संगीतकार), बासू चटर्जी, सुशांत राजपूत, कांचन नायक, लीलाधर कांबळी व सरोज खान आदी दिवंगत कलावंतांना परिषदेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.