राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या घरी चिमुकली पाहुणी आली आहे. ही बातमी कळताच सिनेसृष्टीतील कलाकारांनी आणि सावनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सुमधुर गळ्याची गायिका सावनी रविंद्र ला कन्यारत्न प्राप्त झाले असून तिने पती डॉ. आशिष धांडे सोबत एक सुंदर व्हिडिओ शेअर करत त्यांना गोंडस मुलगी झाल्याची गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
गायिका सावनी रविंद्र आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली, "आई होणं हे सोपं नाहीये. खूप अवघड जबाबदारी आहे. कारण मातृत्व ही स्त्रीला देवाने दिलेली देणगी आहे. आणि माझ्या पोटी एक स्त्रीशक्ती जन्माला आली आहे. आजपर्यंत गायिका म्हणून आईपणावर मी विविध गाणी गायलेली आहेत. त्याबद्दल मी बरंच काही वाचलेलं आहे. ऐकलेलं आहे. आता तो प्रवास प्रत्यक्षात अनुभवताना खूप अलौकीक भावना होती आणि त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. माझ्यासाठी हे सर्व अविस्मरणीय आहे. मला माहित आहे की हा प्रवास सोपा नाही आहे. त्यामुळे माझ्या मुलीला मी खूप मनापासून घडवीन आणि इथून तिचा पुढचा प्रवास खूप आनंददायी असेल याची मला खात्री आहे."