ओटीटी प्लॅटफॉर्म्सची पॉप्युलॅरीटी वाढत असून आता मोठ्या प्रमाणात मराठी वेब सिरीजही येऊ लागल्यात. मराठीतील अनेक नामांकित निर्माते दिग्दर्शक या प्लॅटफॉर्मवर पदार्पण करताना दिसताहेत. ‘अनुराधा’ या गूढ वेब सिरीजची निर्मिती 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची असून दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे.
या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीजमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, ‘’आजवर अनेक चित्रपट केले आहेत प्रथमच वेबसीरिज केली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट केलाय. प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न आवडतोय याबद्दल आनंद आहे.”
'अनुराधा' वेबसिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''ही वेबसिरीज थोडीशी वेगळी आहे. याचा जॉनर सस्पेंस आणि थ्रिलर असून संजय जाधव सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने याचे दिग्दर्शन केले आहे. यातील नाट्यथरार प्रेक्षकांना स्तब्ध करणारा आहे. अशा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम वेबसिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी आगामी काळात घेऊन येणार आहोत.''
‘अनुराधा’ च्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण केले असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेबसीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचे असून पंकज पडघम यांचे संगीत लाभले आहे. तर संकलनाचे काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिले असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत.
संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' ही ७ भागांची वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
हेही वाचा - SRK Plan For Aryan Future : आर्यनच्या करियरसाठी शाहरुख खानने बनवला परफेक्ट प्लॅन