सारेगमप म्हणजे सुरीली मैफिल आणि झी मराठीने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना या सुरील्या मैफिलीत गेली अनेक वर्ष दंग करून ठेवले आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम प्रेक्षकांचा खास आवडता आहे. या कार्यक्रमातील छोट्या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली असून उत्तम गायकी अनुभवायला मिळतेय. 'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालं आणि संपलं सुद्धा. नुकताच सारेगमप लिटिल चॅम्पस या सांगीतिक रियालिटी शोचा सांगता समारंभ झाला. महाअंतिम फेरीत महाराष्ट्राला त्याचा गायनातील ‘लिटिल चॅम्प’ मिळाला.
१२ वर्षांपूर्वी आपल्या गायनाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी पंचरत्न अर्थातच मु्ग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांनी या लिटील चॅम्प्सच्या पर्वात परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
मराठी सारेगमप लिटिल चॅम्पसचा महाअंतिम सोहळा रविवार अर्थातच ५ डिसेंबरला पार पडला. यावेळी ओमकार कानिटकर, स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, सारंग भालके आणि गौरी गोसावी हे पाच लिटील चॅम्प्स टॉप ५ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी गोसावीने विजेती होण्याचा मान पटकावला. यावेळी पारितोषिक म्हणून गौरीला १ लाखाची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली. तर उपविजेत्या ठरलेल्या ओमकार कानिटकर आणि सारंग भालकेला प्रत्येकी ७५ हजारांची नॅशनल सेव्हिंग्ज सर्टीफिकेट देण्यात आली.
या महाअंतिम सोहळ्याला गायक सुदेश भोसले, अन्नु कपूर, तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. महाअंतिम सोहळ्यात पोहोचलेल्या साऱ्याच स्पर्धकांनी यावेळी एकाहून एक सरस गाणी सादर केली. मात्र, या सगळ्यात वरचढ ठरली ती कांदिवली, मुंबईची गौरी गोसावी जी ठरली यावर्षीची ‘सारेगमप लिटिल चॅम्प’.
हेही वाचा - ‘मराठी बाहुबली’ मधील बेला शेंडेच्या आवाजात स्वरबद्ध झालेली गाणी भावताहेत प्रेक्षकांना!