महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनाक्षीनंतर एकतावर का भडकला 'शक्तिमान' मुकेश खन्ना? जाणून घ्या कारण - रामायण

लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनने शक्मिमान ही मालिका दाखवली नसती तर मी नवीन एपिसोड घेऊन नक्कीच आलो असतो, असे मुकेश खन्नाने म्हटले होते. यावेळी बोलताना त्याने एकता कपूरवर निशाणा साधत म्हटले की, शक्तिमानचे नवे व्हर्जन एकता कपूरच्या महाभारत (2008) सारखे असणार नाही.

Mukesh Khanna slams Ekta Kapoor
शक्तिमान

By

Published : Apr 8, 2020, 2:42 PM IST

मुंबई - लॉकडाऊनमुळे १९८० -९० च्या दशकातील अनेक टीव्ही सिरीयल्स दूरदर्शनवर दाखवल्या जात आहेत. यात रामायण आणि शक्तीमान या गाजलेल्या मालिकांचा समावेश आहे. यामुळे मुकेश खन्ना सध्या पुन्हा चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हावर टीका करणारा मुकेश खन्ना सध्या एकता कपूरवर भडकला आहे.

खरंतर मुकेश खन्ना शक्तिमान नावाची नवी मालिका घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे. यासाठी त्याने कामही सुरू केले आहे. अलिकडेच एका न्यूज पोर्टलशी दिलेल्या मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला होता. लॉकडाऊनच्या काळात दूरदर्शनने ही मालिका दाखवली नसती तर मी नवीन एपिसोड घेऊन नक्कीच आलो असतो, असे त्याने म्हटले होते. यावेळी बोलताना त्याने एकता कपूरवर निशाणा साधत म्हटले की, शक्तिमानचे नवे व्हर्जन एकता कपूरच्या महाभारत (2008) सारखे असणार नाही.

आपल्याला माहिती असेल की एकता कपूरने 2008 मध्ये 'कहानी हमारे महाभारत की' या नावाची एक मालिका केली होती. याचे प्रसारण ७ जुलै २००८ ते ६ नोव्हेंबर २००८ मध्ये झाले होते. यावर टीका करताना मुकेश खन्ना म्हणाला की, एकताच्या महाभारतमध्ये द्रोपदीच्या मानेवर टॅटू गोंदण्यात आला होता. एकता कपूरचे महाभारत काय नव्या युगाचे होते ? मुकेश खन्ना म्हणाला, संस्कृती कधीच मॉडर्न होऊ शकत नाही. ज्या दिवशी संस्कृतीला मॉडर्न कराल त्या दिवशी ती संपेल. एकताने केला तसा, मी कधीच अशा महाभारतासारखा शक्तिमानचा मर्डर होऊ देणार नाही. आपल्या समोर उदाहरण आहे.

मुकेश खन्ना पुढे म्हणाला की, मालिकेचे नाव जर 'क्योंकि ग्रीक भी कभी हिंदुस्तानी थे' असे असते तर मी एकता कपूरच्या महाभारताचा स्वीकार केला असता. परंतु तिला महाकाव्याची हत्या करण्याची परवानगी कोणी दिली ? खन्ना पुढे म्हणाला, तिने देवव्रताच्या भीष्म प्रतिज्ञाचा खरा मायना बदलून टाकला आहे आणि सत्यवतीसारख्यांना खलनायक बनवले आहे. हे लोक व्यासमुनीहून स्मार्ट होण्याचा प्रयत्न करीत आहेत, याला माझा सक्त विरोध आहे. रामायण - महाभारत इतिहास नाही किंवा पौराणिक कथा नाही, हे मला सांगायचे आहे.

अलिकडेच मुकेश खन्नाने सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधला होता. रामायण ज्यांनी पूर्वी पाहिलेले नाही त्यांच्यासाठी पुन्हा दाखवले जात असेल तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असल्याचे मुकेश खन्ना म्हणाला होता. धार्मिक ग्रंथाची माहिती नसलेल्या सोनाक्षी सिन्हासारख्यांना याची चांगली मदत होईल. तिच्यासारख्या लोकांना हेदेखील माहिती नाही की, हनुमानाने संजीवनी कुणासाठी आणली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details