मुंबई - ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. 'मी टू चळवळ' आणि महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खन्ना सध्या चर्चेत आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी खन्ना यांनी एक पत्रक काढत स्पष्टीकरण दिले आहे.
'माझ्या वक्तव्याचा आणि एकूणच त्या व्हिडिओचा उलट अर्थ काढला गेला आहे. महिलांनी काम करूच नये असे मी कधीही म्हणालो नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, माझ्या वक्तव्याला तोडून-मोडून समोर मांडू नका,' असे खन्ना यांनी या पत्रकात म्हटले आहे.
माझ्या मनात स्त्रियांबद्दल नितांत आदर आहे. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदं भूषवण्याव्यतिरिक्त महिला थेट अंतराळातही गेल्या आहेत. त्यांनी त्यांची जागा मिळवली आहे, असेही खन्ना म्हणाले.