मोनालिसा बागल सोशल मीडियावर खूप व्यस्त असते आणि ही सुंदर अभिनेत्री आपले छान छान फोटो टाकत असतानाच सामाजिक संदेश पोहोचविण्याचे कामही करत असते. गेली दीडेक वर्षे थैमान घातलेल्या कोरोना महामारीवर प्रतिबंधक लस जरी निघाली असली तरी ती सर्वांना लीलया मिळत नाहीये. अभिनेत्री मोनालिसा बागलला सुद्धा लसीचा पहिला डोस घेण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. त्याबद्दल तिची तक्रार अजिबात नाहीये आणि तिने आपल्या फॅन्सना सल्ला देखील दिलाय की लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरा. तिने सोशल मीडियावर लसीकरणाच्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.
त्याबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, “'व्हॅक्सिनेशन' ही आधुनिक काळातील गरज आहे, भविष्याची गरज तर आहेच आहे असं म्हटलं तरी ते योग्य ठरणार आहे. कोरोनासारख्या महामारीतून आपल्या सर्वांची सुटका करून घेण्यासाठी आणि स्वतःला आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी 'लसीकरण' हा एकमेव उपाय आहे. 'लस घेऊन आपण सुरक्षित झालो आहोत, आता कशाला मास्क हवा', असा विचार करणारी लोकं आपल्या आजूबाजूला आहेत. परंतु माझा त्या सर्वांना सल्ला आहे की कोरोनासमोर कोणाचेही शहाणपण चालत नाही. कोरोना होऊ देण्यापेक्षा त्यापासून बचाव करणे जास्त सोप्प आहे. त्यामुळेच कोरोना रोखण्यासाठीच्या त्रिसूत्रीचा अवलंब करा. मुखपट्टी वापरा, सतत हात धुवा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा.”