मुंबई -भारतासाठी वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाकांक्षी असलेल्या 'मंगळ' मोहिमेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नु, विद्या बालन, क्रिती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं 'दिल मे है मार्स' प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
इंटरनेटवर सध्या या गाण्याने धुमाकुळ घातला आहे. हे गाणं या चित्रपटाचं अँथम साँग आहे. या गाण्यात 'मिशन मंगल'च्या टीमची मेहनत पाहायला मिळते. बेनी दयाल आणि विभा सराफ यांनी हे गाणं गायलं आहे.'
'मिशन मंगल' या चित्रपटात मंगळावर जाण्यासाठी कशाप्रकारे भारतीय वैज्ञानिकांनी अथक मेहनत घेतली, हे दाखवण्यात येणार आहे. शर्मन जोशी, नित्या मेनन यांनीही या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
'बाटला हाऊस'सोबत होणार टक्कर
मागच्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी १५ ऑगस्ट रोजी जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मागच्या वर्षी अक्षयचा गोल्ड आणि जॉनचा सत्यमेव जयते हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्हीही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'गोल्ड'ने 'सत्यमेव जयते'ला कमाईच्या बाबतीत चांगलीच टक्कर दिली. मात्र, प्रेक्षकांचा दोन्हीही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता यावर्षी जॉनचा 'बाटला हाऊस' हा चित्रपट देखील १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देखील सत्यकथेवर आधारित आहे. त्यामुळे 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस'पैकी कोणता चित्रपट तिकीटबारीवर बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.