‘आई कुठे काय करते’ मालिकेतील भाऊ अनिरुद्ध आणि अविनाश यांची भूमिका करीत असलेले कलाकार मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे हे तब्बल १३ वर्षांनंतर एकत्र काम करीत आहेत. याआधी तेरा वर्षांपूर्वी या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यामुळे या लाडक्या सहकलाकारासोबत तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद मिलिंद गवळी यांनी शेअर केला आहे.
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशमुख कुटुंबाला अरुंधतीचा विरह सहन होत नाहीय. अश्यातच अनिरुद्धचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखच्या येण्याने कुटुंबातल्या प्रत्येकालाच थोडा धीर मिळाला आहे. देशमुख कुटुंबाची विस्कटलेली घडी पुन्हा पुर्ववत करण्याची जबाबदारी सध्या अविनाशच्या खांद्यावर आहे. अभिनेते मिलिंद गवळी आणि शंतनू मोघे या मालिकेत भावाची भूमिका साकारत आहेत. अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या लाडक्या मित्राच्या भेटीचा योग तेरा वर्षांनी जुळून आलाय त्यासंबंधित खास किस्सा सांगितला.
‘शंतनु मोघे या अतिशय गोड माणसाबरोबर तेरा वर्षांपूर्वी ‘हळद तुझी कुंकू माझं या सिनेमामध्ये पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाचं संपूर्ण शूटिंग साताऱ्याच्या आजुबाजूच्या खेडेगावात झालं. शंतनूचा तो पहिलाच मराठी चित्रपट होता. मराठी चित्रपट सृष्टीत त्याचं पदार्पण या सिनेमानं झालं. एका उत्तम कलाकाराचा तो मुलगा असल्यामुळे त्याच्यातही ते सगळे गुण होते. पहिलाच चित्रपट असला तरी कामाची जाण खूप छान होती, कष्ट करायची तयारी होती. त्याचा सगळ्यात उत्तम गुण म्हणजे तो माणूस म्हणून खूपच गोड आणि लाघवी आहे.”