मुंबई -लॉकडाऊन उठल्यानंतर सर्वप्रथम टेलिव्हिजन मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले. वर्षभर अडकलेले नवीन प्रोजेक्ट्स मार्गी लागले आणि प्रेक्षकांना आता नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. झी मराठीवर ‘उत्सव नात्यांचा, नव्या कथांचा’ सुरु झाला असून मार्च महिन्यात दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापैकी 'पाहिले न मी तुला' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली असून 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा नाईकही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'झी मराठी'चे व्यवसायप्रमुख नीलेश मयेकर म्हणाले, ''मनोरंजनाचा विचार करताना पुढच्या काळात 'उत्सव नात्यांचा, नवीन कथांचा' या घोषवाक्यासह झी मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. राज्याच्या विविध भागातील लेखकांनी लिहिलेल्या कथा मालिकारुपात पाहायला मिळणार असून मार्चमध्ये दर रविवारी एक सोहळा आणि दर सोमवारी एक नवीन मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही मराठी माणसांचे विश्व आहे. त्याही कथांवर आधारित मालिका सुरू करण्यात येणार आहेत.''
'पाहिले न मी तुला' ही आणखी एक नवीन मालिका सुरू होणार असून यात अभिनेता शशांक केतकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या वाहिनीवर सुरू असलेल्या 'माझा होशील ना' या मालिकेत सुयश पटवर्धनची भूमिका साकारणारा अभिनेता आशय कुलकर्णी आणि नवोदित अभिनेत्री तन्वी मुंडले हे दोघेही नव्या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.
गेल्यावर्षी 'अण्णा नाईक' ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली आणि 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नवीन वर्षांत अण्णा नाईक आणि त्यांचा अदभूत खेळ पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेच्या नवीन पर्वाच्या पटकथा आणि लेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा प्रह्लाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांच्या खांद्यावर आहे. राजेंद्र घाग रत्नागिरीचे असून ते सिंचन विभागात कार्यरत होते. आपली नोकरी सांभाळून मासिकांत कथा लिहिणाऱ्या घाग यांनी साठाव्या वर्षी पहिल्यांदा मालिकेसाठी लेखन केले. मात्र मालिकेचे हे तिसरे पर्व आहे की वेगळे कथानक पाहायला मिळणार, याबाबत गुप्तता राखण्यात आली आहे.
झी मराठीने नेहमीच नात्यांना महत्त्व दिले आहे. त्यांनी निष्ठेला महत्व देत पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. राज्याच्या विविध भागातील नव्या दमाचे लेखक वाहिनीशी जोडले गेले आहेत. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचा लेखक तेजस घाडगेने पहिल्यांदाच इतकी मोठी मालिका केली होती. आता 'काय घडलं त्या रात्री' ही मालिका तो लिहितो आहे. सातारचा विशाल कदम आणि स्वप्निल गांगुर्डे यांनी मिळून 'देवमाणूस' मालिकेची कथा लिहिली आहे, या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. याआधी राजू सावंत यांनी या आधी तू तिथे मी, जय मल्हार, रात्रीस खेळ चाले ची दोन्ही पर्व, लागीर झालं जी यांसारखे दर्जेदार कार्यक्रम दिले आहेत.
प्रेक्षकांना विविधता देणारा झी मराठीचा ‘उत्सव नात्यांचा नव्या कथांचा’ मार्च महिन्यात अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : चौथ्या कसोटीत भारत 'या' गोलंदाजाला खेळवणार?