नवीन पिढीला ‘स्वातंत्र्य’ खूप प्रिय आहे परंतु त्यामुळे पालकांना नेहमीच काळजी वाटत रहात असते. तरुणाईला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून पालक सतर्क राहत असतात. वेळ पडली तर ते आपल्या पाल्याला वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. तरीही काही वेड्यावाकड्या घटना घडतंच असतात. अशाच प्रकारच्या विषयावर भाष्य करणारी एक मालिका सोनी मराठीवर येऊ घातलीय जिचं नाव आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’
आपल्या मुलासाठी जिवाची बाजी लावून गड उतरलेली हिरकणी असो किंवा स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांना धडे देणाऱ्या जिजामाता असो. आईचं अस्तित्व तिच्या मुलासाठी नेहमीच कवच बनलं आहे. असंच जेव्हा स्वतः च्या मुलीचा जीव धोक्यात आहे हे समजत तेव्हा एक आई दूर्गेच रूप धारण करून असुरांचा नाश करण्याची शपथ घेते तेव्हा पुन्हा सिद्ध होतं की आई मुलासाठी काहीही करू शकते. एक शिक्षिका, एक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा दिसणार आहे.
आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी, ही आईची दोन रुपं. मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणारी आई आणि तिची रूपं 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वतः ला झालेला त्रास आई एकवेळेस सहन करेलही पण तिच्या मुलांच्या वाटेला कोणी गेलं तर ती वाघीण व्हायला देखील मागेपुढे बघणार नाही.