महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्लॅनेट मराठी ओटीटी' वर उपलब्ध होणार मराठी मनोरंजनाचा खजिना!

ओटीटीवर मराठीला प्राधान्य दिलं जात नाही अशी ओरड होत होती आणि म्हणूनच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ चा जन्म झाला. हा प्लॅटफॉर्म फक्त मराठी कन्टेन्ट प्रदर्शित करतो त्यामुळे आता मराठी निर्मातेही खूष आहेत. आता 'जॉबलेस', 'सोपं नसतं काही', 'हिंग पुस्तक तलवार', 'बाप बीप बाप' आणि 'परीस' या वेगवेगळ्या जॉनरच्या जबरदस्त वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी'च्या प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Planet Marathi OTT
प्लॅनेट मराठी ओटीटी'

By

Published : Aug 4, 2021, 10:26 PM IST

मराठी चित्रपट प्रामुख्याने आशयघनतेसाठी ओळखला जातो. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सची चलती सुरु असून भरपूर नवनवीन कन्टेन्ट त्यावर बघायला मिळतो. आता मराठीतही अनेक वेब सिरीज आणि वेब फिल्म्स बनत असून प्रेक्षकही त्याला उत्तम प्रतिसाद देताना दिसताहेत. ओटीटीवर मराठीला प्राधान्य दिलं जात नाही अशी ओरड होत होती आणि म्हणूनच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ चा जन्म झाला. हा प्लॅटफॉर्म फक्त मराठी कन्टेन्ट प्रदर्शित करतो त्यामुळे आता मराठी निर्मातेही खूष आहेत.

हल्लीच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर जगभरातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणारा 'जून' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आपल्याकडे मराठी साहित्याचे भंडार आहे आणि याच मराठी साहित्याला मनोरंजनच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेले आणि साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या या मायमराठीला सातासमुद्रापार पोहोचवणारे 'प्लॅनेट मराठी' हे मराठीतील पहिलेवहिले ओटीटी असून अखेर ऑगस्टमध्ये ते अधिकृतरित्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता 'जॉबलेस', 'सोपं नसतं काही', 'हिंग पुस्तक तलवार', 'बाप बीप बाप' आणि 'परीस' या वेगवेगळ्या जॉनरच्या जबरदस्त वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी'च्या प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

'प्लॅनेट मराठी ओटीटी' आणि त्याच्या वेगळेपणाबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्लॅनेट मराठीच्या वेगळेपणाबद्दल सांगायचे तर हा पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे जिथे सर्व कंटेन्ट मराठीत असेल आणि तोसुद्धा उत्कृष्ट दर्जाचा. आपली टॅगलाईनच अशी आहे, ''म मानाचा... म मराठीचा... यातच सगळे आले. आपल्या मराठी साहित्याला लाभलेला वारसा जपत त्याला आधुनिक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून आम्ही जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचू. तसेच चौकटीबाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ते पुढे म्हणाले, “आज 'प्लॅनेट मराठी'चा परिवार बहरत आहे. मराठी इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार, दिग्दर्शक 'प्लॅनेट मराठी'सोबत जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबतच काही नवोदित कलाकारही या परिवाराशी जोडले गेले आहेत. मुळात मराठी प्रेक्षकवर्ग हा चोखंदळ आहे. त्यामुळेच इथे नवनवीन विषय हाताळले जातील. घोषणेपासूनच आम्ही प्रेक्षकांना दर्जेदार कंटेन्ट देऊ, असा विश्वास दिला होता. ही बांधिलकी आम्ही कायमच जपू. वेबसिरीज, वेबफिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट यांच्यासह अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीस येऊ.'

आपली कला, संस्कृती, साहित्य यांचा आधुनिक मिलाफ आपल्याला इथे पाहायला मिळणार असून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांना वेबसिरीज, चित्रपट, संगीत, कराओके, कॉन्सर्ट, टॉक शो असे विविध मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार हे नक्की. 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांसाठी हजारो तासांचा मनोरंजनात्मक खजिना उपलब्ध होणार असून यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या कंटेन्टचा समावेश असेल. यासाठी प्रेक्षकांना अतिशय अल्प अशी किंमत मोजावी लागणार आहे.

हेही वाचा - 'मन उडू उडू झालं' मालिकेत झळकणार अजिंक्य राऊतसह हृता दुर्गुळे

ABOUT THE AUTHOR

...view details