पुणे -बोचरे संवाद आणि सामाजिक घडामोडींवर उपरोधिक भाष्य करणारं एक नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय. कर्त्यापेक्षा क्रियापदाला जास्त महत्व दिलं की 'कर्म' चुकत जातं, या संकल्पेनेवर आधारीत 'सुवर्णमध्य' असं नाटकाचं नाव आहे. गार्गी मल्टिमिडीया आणि संकल्प रंगकर्मी प्रस्तुत हे दोन अंकी नाटक आहे.
रेहमान पठाण या तरुणाने या नाटकाचे लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलीये. गणेश काकडे हे या नाटकाची निर्मिती करत आहेत. विश्वजीत कांबळे हे पार्श्वसंगीत, तर, नैपथ्य सुधीर देशपांडे आणि प्रकाश योजना राजकुमार मुळे यांचे आहे. या नाटकात एकूण १० पात्र असून सर्व युवा कलाकार आहेत.
अभिनेते मोहिनीराज गटणे म्हणजेच तुला पाहते रे फेम निमकर यांनीही 'सुवर्णमध्य' नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आजकाल आपण आपल्या जीवनात इतकी धावपळ करतोय, की जीवनातील समाधान, आनंदच हरवून बसलोय. प्रेम, वासना, मैत्री, सत्ता, संपत्ती, नोकरी, एमपीएससी-युपीएससी आणि नैराश्य हे विषय मनाला भिडवण्यात हे नाटक नक्कीच यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया रेहमान याने दिली. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना क्षणक्षणाला हसवणारे व अलगट डोळ्यांच्या कडा ओले करणारे हे नाटक आहे. विशेष करून युवकांना मोलाचे मार्गदर्शन मिळेल अशी, आशाही त्याने यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मोहिनीराज गटणे म्हणजेच तुला पाहते रे फेम निमकर यांनीही 'सुवर्णमध्य' नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, येथे होणार आहे.
मराठी रंगभूमीवर अनेक नवनवे प्रयोग पाहायला मिळतात. आशय-विषय आणि प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवीन आणि जुने नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. त्यामुळं मराठी रंगभूमीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही.