मुंबई - नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षक-प्रिय झालेला आस्ताद काळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. गाण्याचे उत्तम अंग असलेल्या या अभिनेत्याने मराठी म्युझिक रिऍलिटी शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. त्याच्या परखड स्वभावाचे दर्शन मराठी ‘बिग बॉस’ मधून घडले होते आणि अनेकांना ते भावले होते. तो आता कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ मधून एका वेगळ्या रूपात दिसणार आहे मात्र, मालिकेमध्ये त्याची नक्की काय भूमिका असणार आहे, त्याच्या येण्याने नक्की काय घडेल, श्रीधर–स्वातीच्या आयुष्यात काय उलथापालथ होईल, हे सगळे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न केले. त्याने रचलेल्या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली आणि तिने लग्नास होकार दिला. आता कुठे स्वाती आणि श्रीधरच्या संसाराला सुरुवात झाली होती. पण, श्रीधरचा खोटेपणा, तो लपवत असलेले सत्य आता स्वातीसमोर आले आहे. श्रीधरचा खरा चेहरा स्वातीसमोर आला आहे. स्वातीला एकच प्रश्न आहे की, श्रीधरने इतका मोठा विश्वासघात का केला ? श्रीधर आणि स्वातीचे नाते खरंतर खोट्याच्या आधारावरच उभे होते, स्वातीची काहीच चूक नसताना तिला या सगळ्याला सामोरे जावे लागत आहे.