'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'होणार सून मी ह्या घरची', 'फुलपाखरू', या मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी अनेक लोकप्रिय मालिका आज पर्यंत प्रेक्षकांसाठी सादर केल्या आहेत. गुणी आणि कल्पक दिग्दर्शक म्हणून मंदारकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांची आगामी मालिका प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करेल असं म्हणायला हरकत नाही.
‘मन उडू उडू झालं’ या त्यांच्या मालिकेने देखील प्रेक्षकांची मन जिंकली आहे. मंदार देवस्थळी यांच्या मालिकांमधील प्रेमकथांचा आशय हा नेहमी रंजक असतो. मंदार देवस्थळी पुन्हा एकदा नवी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसत झी मराठीवरील आगामी मालिका 'तू तेव्हा तशी' मधून ते अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत.
या मालिकेबद्दल बोलताना मंदार देवस्थळी म्हणाले, "आम्ही कायमच काहीतरी नवी करण्याचा प्रयत्न करतो. चालू असलेल्या अनेक प्रेमकथा सांगितल्या, राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट सुद्धा कदाचित आली असेल पण आम्ही हि गोष्ट नव्या पद्धतीने सांगतो. हेच तू तेव्हा तशी या मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेचं कथानक देखील प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे."