पिवळा रंग देवी लक्ष्मीचा प्रिय रंग आहे. पिवळा रंग बुद्धीच्या विकासाचा प्रतीक असल्यामुळे अभ्यास, एकाग्रता आणि मानसिक स्थिरतेसाठी फारच उत्तम आहे असे मानले जाते. पिवळा रंग हा मांगल्याचा, समृद्धीचा रंग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला मान असतो. आत्मविश्वास निर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. हाच पिवळा रंग 'मन झालं बाजिंद' या नवीन मालिकेत प्रेमाचा रंग असणार आहे आणि याच पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची, मालिकेतील प्रेमी जोडप्याची, प्रेमकहाणी फुलणार आहे.
खरंतर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असल्याचे दर्शवीले जाते तसेच लाल गुलाबाची फुलंसुद्धा प्रेमात पसंत केली जातात. परंतु पहिल्यांदाच ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.