मुंबई- रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावरचा अवलिया कलाकार म्हणून मकरंद देशपांडे ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत अभिनयात मोजक्याच तरीही लक्षवेधक, हटके आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त हिंदी नाटके लिहिणारे मकरंद देशपांडे यांनी मराठी रंगभूमीवर देखील अभिनयाचा श्रीगणेशा केला. पण आता मकरंद टेलिव्हिजनवर पुनरागम करून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
झी मराठी वाहिनीवर १० वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाने १० वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची ही सुवर्ण संधी मिळेल.