मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. भोसले यांच्या नावाची घोषणा या बैठकीत करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन त्यांचे अभिनंदन केले. ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
आशा भोसलेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशा भोसले यांचे अभिनंदन केले. राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पू. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तर दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिला होता. समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते.
हेही वाचा - काही पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्या, त्यांच्यावर कारवाई होणारच - अजित पवार