मुंबई -छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमुळे बरेच स्पर्धक अल्पावधीत लोकप्रिय होतात. त्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी या शोच्या माध्यमातून मदत होते. आजवर या शोमधील बरेच स्पर्धक सुपरस्टार झाले आहेत. मात्र, बऱ्याच जणांना ही प्रसिद्धी सांभाळून ठेवता येत नाही. किंवा चुकीच्या निर्णयामुळे त्याचं करिअर सुरू होण्यापूर्वीच नष्ट होतं. अजमत हुसैन या स्पर्धकाबाबतही असंच काहीसं घडलं आहे.
२०११ साली लोकप्रिय ठरलेल्या 'सारेगमप लिटील चॅम्प' या रिअॅलिटी शोमधुन अजमत हुसैन हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यावेळी तो अवघ्या १० वर्षांचा होता. त्याने या शोमधुन तुफान लोकप्रियता मिळवली. एवढंच काय, तर या शोचा तो विजेताही ठरला होता. मात्र, पुढे त्याला वाईट संगतीमुळे नशेचं व्यसन जडलं. त्याचा प्रभाव त्याच्या संगीत करिअरवर झाला.
हेही वाचा -फराह खानच्या आगामी चित्रपटात हृतिकसोबत झळकणार अनुष्का?
आता सोनी टीव्हीवर लवकरच 'इंडियन ऑयडॉल' हा रिअॅलिटी शो सुरू होणार आहे. या कार्यक्रमातून अजमत त्याच्या करिअरची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनदरम्यान त्याने त्याच्या आयुष्यातील कठिण प्रसंगांचा उलगडा केला.