‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन सूत्रसंचालित खेळाला पहिला ‘करोडपती’ स्पर्धक मिळाला आहे. मराठीतील त्याची आवृत्ती असलेल्या ‘कोण होणार करोडपती’ अजूनतरी कोणी तो पल्ला गाठलेला नाहीये. ‘कोण होणार करोडपती’ मध्ये दर आठवड्याला कर्मवीर विशेष भागामध्ये समाजकार्य करणाऱ्या आणि सामान्यजनांसाठी झटणाऱ्या लोकांना पाचारण केले जाते आणि या खेळातून त्यांच्या समाजकार्यासाठी रक्कम जिंकण्याची संधी दिली जाते.
‘कोहोक’ च्या येणाऱ्या भागात अभिमानाने उर भरून येईल अशी व्यक्ती कर्मवीर विशेष भागामध्ये हजेरी लावणार आहे. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या पतीचं, मेजर कौस्तुभ राणे यांचं देशसेवेचं व्रत पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी लेफ्टनंट कनिका राणे या स्वतः सैन्यात भरती झाल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये कनिका आर्मीमध्ये रुजू झाल्या. आता कनिका यांना कौस्तुभ यांची स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि अनेक वीरपत्नींसाठी काम करायचं आहे.
'कोण होणार करोडपती' - कर्मवीर विशेषमध्ये “बॅटल कॅज्युअल वेल्फेअर फंड” या संस्थेसाठी खेळायला लेफ्टनंट कनिका राणे येणार आहेत. या खेळात त्यांना साथ देणार आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांनी सोनालीला पाहिलेलं आहे. सोनाली आणि लेफ्टनंट कनिका मिळून हा ज्ञानाचा खेळ खेळणार आहेत. कनिका यांनी मंचावर कौस्तुभ यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय कसा घेतला, हेही सांगितलं.