सध्या विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट सुरु आहे. भारताची एकेकाळची ‘ऑन-कोर्ट’ डबल्स-जोडी लिअँडर पेस आणि महेश भूपती यांनी एकत्रितपणे अनेक टेनिस स्पर्धा जिंकल्या परंतु अनेक जोड्यांप्रमाणे त्यांच्याही दोस्तीत ‘ब्रेक पॉईंट’ आला. एकेकाळचे जिवलग मित्र असलेल्यांवर अशी वेळ आली की ते एकमेकांचे तोंडही बघू शकत नव्हते. त्यांच्या ह्या ‘ब्रोमान्स ते ब्रेक पॉईंट’ पर्यंतचा प्रवास आता वेब सिरीज मध्ये कैद होतोय. त्यासाठीच #ली-हेश म्हणजेच लिअँडर पेस आणि महेश भूपती एकत्र आलेत ‘ब्रेक पॉईंट’ या डॉक्यु-ड्रामा साठी. यात त्यांचा दोस्ती पासून दुश्मनी पर्यन्तचा प्रवास दर्शविण्यात येणार असून ‘ऑन-कोर्ट’ आणि ‘ऑफ-कोर्ट’ आयुष्य देखील चितारलं जाणार आहे. महत्वाचे म्हणजे याचे दिग्दर्शन करणार आहेत अनेक पुरस्कार विजेते दिग्दर्शक नवरा-बायको जोडी नितेश तिवारी आणि अश्विनी अय्यर तिवारी.
१९९९ साली लिअँडर पेस आणि महेश भूपती ही टेनिस डबल्स ची नं १ जोडी होती. तसेच त्यांच्याविरुद्ध खेळताना इतर जोड्या थोड्याफार बिचकूनच खेळायच्या एव्हडा त्यांचा दरारा होता. वर्षानुवर्षे एकमेकांच्या संपर्कात नसलेले हे दोघे ४ जुलै ला अचानक आपल्या विम्बल्डन विजयाच्या २२व्या स्मृतिदिनाबद्दल एकमेकांना ‘ट्विट’ करू लागले आणि लोकांच्या भुवया उंचावल्या. तेव्हाच लोकांना कल्पना आली होती की ‘दाल में कुछ काला हैं’. आता ‘ब्रेक पॉईंट’ जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालंय.
‘ब्रेक पॉईंट’ मधून या भारतीय टेनिस दिग्गजांचा खेळातील उंची तसेच खाजगी जीवनातील चढउतार दर्शविले जाणार असून प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी त्याची मांडणी असेल. श्रद्धा, कठोर परिश्रम, महत्वाकांक्षा, संघर्ष आणि विवाद हे तर असणारच आहे परंतु यापेक्षाही ही एक आशेची कहाणी असेल जी सर्व विसंगती असूनही एकत्र कसे राहता येते हे अधोरेखित करेल. दंगल, पंगा, छिचोरे, नील बट्टे सन्नाटा, बरेली की बर्फी अश्या असाधारण चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या अर्थस्काय पिक्चर्स च्या बॅनरखाली याची निर्मिती होत आहे आणि झी५ याचे प्रसारण करेल.