‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेच्या पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच तिसऱ्या पर्वावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. परंतु या मालिकेतील सर्वात लक्षवेधी पात्र म्हणजे शेवंता. परंतु या शेवंताला आता नवा चेहरा मिळणार. म्हणजे ‘प्लास्टिक सर्जरी’ वगैरे काही नाही, फक्त ‘रिप्लेसमेंट’ झाली आहे. सध्या मालिकेत शेवंता या लोकप्रिय व्यक्तिरेखेच्या जागी एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि हा ‘शेवंता’ चा नवा चेहरा आहे, अभिनेत्री कृतिका तुळसकर चा. यापुढे कृतिका शेवंताची भूमिका साकारणार आहे.
कृतिका गेली १८ वर्षात थिएटर माध्यमात कार्यरत असून तिने अनेक नाटक आणि चित्रपटात काम केलं आहे. कृतिका एक नृत्यांगना आहे, ती कथ्थक विशारद आहे. प्रोफेशनली सायकॉलॉजिस्ट असलेली कृतिका आपली आवड जोपासण्यासाठी अभिनय क्षेत्राकडे वळली. शेवंताची भूमिका साकारणे हा तिच्या अभिनय क्षेत्रामधील कारकिर्दीतला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असून त्याविषयी बोलताना कृतिका म्हणाली, "रात्रीस खेळ चाले ही मालिका आणि त्यातील पात्र ही खूप लोकप्रिय असून प्रेक्षक त्यावर खूप प्रेम करतात. शेवंता ही भूमिका माझ्या वाट्याला आली असली तरी त्या भूमिकेच्या लोकप्रियतेकडे पाहता ही भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी अशा करते कि प्रेक्षकांना माझं काम आवडेल आणि ते मला शेवंता म्हणून स्वीकारतील."