नुकताच मातृदिन साजरा केला गेला. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे महत्व वादातीत आहे. परंतु काही वेळा ती जबाबदारी पिता सांभाळताना दिसतो. अशाच एका आईविना बाप-लेकीची अनोखी कथा असलेल्या ‘खेळ मांडला' मधून हे वडिलांचे व मुलीचे नाते हळुवारपणे अधोरेखित केले आहे. ‘खेळ मांडला'चा प्रीमियर फक्त मराठी वाहिनीवर होऊ घेतला आहे. बाप लेकीची हळवी कथा 'खेळ मांडला'द्वारे प्रेक्षकांना गुंतवून आणि खिळवून ठेवत एक वेगळी अनुभूती देईल अशी अपेक्षा फक्त मराठी वाहिनीने व्यक्त केली आहे.
“प्रेम आणि वात्सल्य म्हटलं की सगळ्यांना फक्त आईच आठवते. अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपटातून आईची महती गायली गेली आहे. फक्त वडील हा भाग केवळ ओरडणार, मारणारा आणि शिस्तीचे धडे गिरवणारा हताश असलेला, असं चित्र ऊभ केलं गेलंय. त्यापेक्षा वेगळा वडील माझ्या डोक्यात होता, ज्याला वात्सल्याशी तुम्ही कनेक्ट, रीलेट करू शकता. 'खेळ मांडला'मध्ये वडील आणि मुलीचं जे नातं आहे, त्यातील हळवा भाग दाखविण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तम कथेची जोड मिळाली. या चित्रपटात अभिनय करणाऱ्या सर्व अभिनेत्या मित्रांची मदत मिळाली, निर्माते अशोक नारकरांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा चित्रपट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यात झाला”, असे लेखक - दिग्दर्शक विजू माने म्हणाले.
"साईबाबा श्रद्धा आणि सबुरी" मालिकेवरील 'साईलीला' स्पर्धेला प्रेक्षकांकडून दररोज मिळणारा भरघोस प्रतिसाद, 'सप्तपदी' मालिकेतील अमृता - संजूची अनोखी कथा त्यासोबत संपूर्ण मे महिन्यात दररोज एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रीमियर शोची जबरदस्त मेजवानीमुळे 'फक्त मराठी वाहिनी'ने प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण केले आहे. या शुक्रवारी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेला अशोक नारकर यांच्या 'अमृता प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेला विजू माने लिखित - दिग्दर्शित 'खेळ मांडला' या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो सकाळी ११:३० वाजता 'फक्त मराठी वाहिनी'वर पहायला मिळणार आहे.
“या महिन्यात एकापेक्षा एक सरस - सुपरहिट चित्रपटांचा प्रीमियर 'फक्त मराठी वाहिनी'वर लॉकडाऊन स्पेशलमध्ये सुरु आहे. सर्व चित्रपटांना तसेच "साईबाबा श्रद्धा आणि सबुरी" मालिकेवरील 'साई लीला' स्पर्धेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. बाप - लेकीच्या अत्यंत नाजूक, हृदयस्पर्शी नातेबंधाची गुंफण असलेल्या 'खेळ मांडला' या चित्रपटाचा प्रीमिअर शो आमच्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे” अशी प्रतिक्रिया 'फक्त मराठी वाहिनी'चे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी दिली.