नागपूर - आजवर तुम्ही अनेक फॅशन शो बघितले असतील, मात्र नागपूर येथे नुकताच पार पडलेल्या फॅशन शोची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात आणि देशात सुरू झाली आहे. तुम्ही म्हणाल की काय होत या फॅशनचं वैशिष्ट्य ज्याची इतकी चर्चा सुरू आहे. हा फॅशन शो धावत्या मेट्रो ट्रेन मध्ये आयोजित करण्यात आला होता. यापेक्षा दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा फॅशन शो संपूर्णतः खादीच्या कपड्यांचा होता. श्री, श्रीमती आणि मिस खादी २०२० या शिर्षकाअंतर्गत मेट्रो ट्रेनमध्ये खादी वॉक आयोजित करण्यात आला होता. लायन्स क्लब नागपूर, स्नेहधागा आणि स्वराज सह यू जिंदगी फाउंडेशनच्या वतीने महामेट्रो नागपूर आणि खादी गाव व उद्योग कमिशनच्या वतीने खादी वॉक २०२० या आयोजित फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
फॅशन शो ला प्रतिसाद
धावत्या मेट्रोत खादी कपड्यांचा 'फॅशन शो' या फॅशन शो करीता ३५ स्पर्धकांना निवड फेरीच्या माध्यमातून निवडण्यात आले होते. त्यानंतर वेगवेगळ्या तज्ञांकडून त्यांना खादी ड्रेसेस परिधान करून तयार करण्यात आले. धावत्या ट्रेनमध्ये हा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता, ही वेगळी संकल्पना असल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद याला मिळाला आहे.
खादी वस्त्रांचं ब्रँडिंग
या खादी फॅशन शोच्या माध्यमातून खादीपासून तयार करण्यात आलेल्या फॅशनेबल कपड्यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे. या माध्यमातून खादीला नवसंजीवनी मिळणार आहे. या फॅशन शोमध्ये पारंपरिक वेशभूषेशिवाय खादीचे आकर्षक डिझाइनर कपडे घातलेले मॉडेल वॉक करताना दिसून आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी येणार होते, मात्र काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत. नितीन गडकरी हे देखील खादी प्रेमी आहेत.