मुंबई- उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला काल गुन्हे शाखेने अटक केली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात ही अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
राज कुंद्राच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून आणखी एकाला अटक केली आहे. रयान थारप, असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दोघांना आज (मंगळवार) कोर्टाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
बॉलिवूड सेलेब्जचे मौन
राज कुंद्राच्या अटकेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळी मौन बाळगून आहेत. इतरवेळा शिल्पा शेट्टीसाठी भलावण करणारे सर्वच बॉलिवूडकर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. मात्र काही मोजक्या लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना रणौतची प्रतिक्रिया
कंगना रणौतने राज कुंद्राच्या अटकेनंतर इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलंय, "म्हणूनच मी म्हणत होते की फिल्म इंडस्ट्री म्हणजे गटर आहे. चमकणारे सर्व काही सोने नसते. बॉलिवूडचे हे खरे रुप मी माझ्या आगामी टिकू वेड्स शेरु या चित्रपटातून उघड करणार आहे."
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला राखी सावंतने दिला पाठिंबा
''जेव्हा असं काही घडत असेल तर यात कंपनी मालकाची काय चूक आहे. सोशल मीडियावरही काही लोक घाण करतात मग यात फेसबुक, इन्स्टाग्रामवाल्यांचा काय दोष आहे. अशा लोकांवर बंदी घातली पाहिजे. मी पूर्णपणे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या पाठीशी आहे,'' असे मत राखी सावंतने व्यक्त केले आहे.
पूनम पांडेची शिल्पा शेट्टीला सहानुभूती
एका आघाडीच्या वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडे म्हणाली, ''या क्षणी मला शिल्पा शेट्टी आणि तिच्या दोन मुलांवर गुदरलेल्या प्रसंगाबद्दल वाईट वाटते. ते कोणत्या स्थितीतून जात असतील याची मी कल्पना करु शकत नाही.''
यापूर्वी पूनम पांडे हिने 2019 मध्ये राज कुंद्रा याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. ती राज कुंद्राच्या कंपनीच्या संपर्कात आली होती व त्याच्या अॅपसाठी तिने करारही केला होता. मात्र करार संपल्यानंतरही त्यांच्या अॅपवर पूनमचा कंटेंट दाखवण्यात येत असल्याचे तक्रार तिने केली होती. या केसचा अद्याप निकाल लागलेला नाही.
सोशल मीडियावर राज कुंद्रा ट्रोल
राज कुंद्राला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर तो भयंकर ट्रोल झाला आहे. आज त्याला जेव्हा पोलीस कोठडी मिळाली तेव्हा सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल करणारी नवी लाट पाहायला मिळाली. आयुष्यात नेहमी योग्य निवड करणे महत्त्वाचे ठरते असा सल्लाही त्याला नेटकऱ्यांनी दिलाय.
हेही वाचा - "शिल्पा आणि राज तर 'बाबा रामदेव'चे शिष्य, तरी 'ध्यान' कसे भरकटले"