नमस्कार,
पत्र लिहिण्यास कारण, की नुकताच मुंबई आणि पुणे येथे घडलेल्या दोन घटनांनी मी चिंतीत झालो आहे. पण मी चिंतीत झालो म्हणून नव्हे, तर कुणालाही चिंता वाटावी अशा त्या घटना आहेत, असं मला वाटल्यामुळेच हे पत्र. शिवाय या घटना नाटकाशी-नाटकवाल्यांशी संबंधीत असल्यामुळे, कलाव्यवहाराशी संबंधीत असल्यामुळे तुम्हाला ते पाठवावं असं मला वाटलं. त्याबाबत आपलं मत जाणून घ्यावं, हाही माझा उद्देश आहे.
सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यातच या घटना घडलेल्या आहेत आणि अजून त्याची कुठेही फारशी वाच्यता वा त्याबद्दल चर्चा झालेली नाही.
९ ते ११ ऑगस्ट या दिवसांत दिल्लीहून जन नाट्य मंच (जनम) हा ग्रूप ‘तथागत’ हे नाटक घेऊन मुंबईला आला होता. हे नाटक सधारण ४५ मिनीटांचे, छोटेखानी आहे. ते पथनाट्याच्या स्वरूपाचं आहे परंतु सादरकर्ते बंदिस्त सभागृहातही त्याचे प्रयोग करतात. मुंबईत त्याचे तीन दिवसांत आठ ठिकाणी प्रयोग झाले. नाटकाचा १० ऑगस्ट रोजी आंबेडकर भवन, दादर येथे प्रयोग होता. तेव्हा पोलिस येऊन नाटकाविषयी चौकशी करून गेले. त्याबद्दल खटकण्यासारखं काही कुणाला वाटलं नाही. परंतु दुसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता अंधेरीच्या ‘हरकत स्टुडिओ’ या छोट्या नाट्यगृहात असलेल्या प्रयोगाच्या आधी वर्सोवा पोलिस स्टेशनचे दोन सीआयडी नाट्यगृहात आले. त्यांनी नाटकाच्या सेटचे फोटो काढले. त्यानंतर ‘जन नाट्य मंच’ ग्रूपचे प्रमुख सुधन्वा देशपांडे यांची चौकशी केली. नाटकाच्या स्वरूपाबाबत चौकशी केली. त्यानंतर ‘हरकत स्टुडिओ’च्या मॅनेजरकडे यांना प्रयोगाला परवानगी कशी दिली, अशी विचारणा करत चौकशी केली. त्यानंतर हे पोलिस इमारतीच्या बाहेर गेले आणि तिथे प्रयोग बघण्यासाठी आलेल्या लोकांचेही त्यांनी फोटो काढले. पुढे नाटकाचा प्रयोग सुरू झाल्यावर ५ ते ७ मिनिटांनी हे दोन्ही पोलिस नाट्यगृहात घुसले आणि रंगमंचपासून चार ते पाच फुटांवर असलेल्या प्रवेशद्वारात उभे राहिले. तिथून त्यांनी प्रयोग पाहिला. नंतर काहीच झालं नाही. ते निघून गेले.
दुसरी घटना १५ ऑगस्ट्च्या पहाटे किंवा १४ ऑगस्टची मध्यरात्र उलटून गेल्यावर पुण्यातल्या एका हॉटेलवर घडली. ‘किस्सा कोठी’, या नावाने तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ग्रूप ‘रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ हे हिंदी नाटक घेऊन काही प्रयोग करण्यासाठी मुंबईतून पुण्याला गेला होता. १४ तारखेला रात्री ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ इथला प्रयोग संपवून, हा पाच जणांचा ग्रूप चिंचवड इथल्या ‘कामिनी’ नावाच्या हॉटेलवर मुक्कामाला गेला असता, मध्यरात्री नंतर अडीच वाजता दोन पोलिसांनी त्यांच्या रूमवर धाड टाकली. ‘तुमच्यात यश खान कोण आहे? तो इथे कसा आला?’ असं विचारत यश खान, या तरुणाची झडती घेतली. त्याचे ‘आयडी प्रूफ’ तपासले. त्याच्या रूममध्ये असलेल्या दोघांशी त्याचा काय संबंध आहे, अशी विचारणा करत तीन पुरुष व दोन स्त्रिया रहात असलेल्या ग्रूपच्या दोन्ही रूमची तपासणी केली. नाटकाचं सर्व सामान उचकटून पाहिलं आणि निघून गेले. अशी झडती करण्याचं कुठलंही वॉरंट त्यांच्यापाशी नव्हतं. १५ ऑगस्ट्च्या सुरक्षेसाठी ही तपासणी आहे, असं त्यानी नंतर सांगितल्याचं कळतं. पण तसं असेल तर संपूर्ण हॉटेलची किंवा इतर खोल्यांची झडती वा अन्य माणसांची चौकशी झालेली नाही. म्हणजे यश खान नावाच्या एका तरुणाकडूनच धोका असल्याची खबर पोलिसंना मिळाली असावी. ती कोणी दिली व त्यातून काय निष्पन्न झालं, या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत, मात्र नाटकाचे बॅक्स्टेज सांभाळणाऱ्या यश खान या एका साध्या तरुणाच्या मनात आणि त्याच्या कुटुंबात कायमची दहशत मात्र निर्माण झाली. या दोन्ही घटना नाट्यकर्मींमध्ये प्रत्यक्ष दहशत निर्माण करणाऱ्या आहेत, असं मला वाटतं आणि त्या एका सरकारी यंत्रणेकडून घडवल्या गेलेल्या आहेत.