मुंबई - बिग बॉसच्या १४व्या पर्वातील स्पर्धक अभिनेत्री जस्मीन भसीन हिने बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या विषयावर भाष्य केले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आऊटसायडर्स असण्याचा काही त्रास झाला नसल्याचे ती म्हणाली. अनेक टीव्ही शोमध्ये जस्मीनने भूमिका साकारल्या आहेत. दिल्लीतून ती मुंबईत करिअरसाठी पोहोचली होती.
जस्मीनने वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, ''बॉलिवूड माझ्यासाठी अडथळा ठरला असे कधीच झाले नाही. कारण मला ऑडिशन्ससाठी कॉल आले आणि मला कामही मिळाले. ही एक अशी इंडस्ट्री आहे, की जिथे तुमच्या क्षमतेनुसार सर्वश्रेष्ठ व्यक्तीरेखा मिळते, असे मला वाटते. प्रत्येकाला संधी मिळते.''
जस्मीनला 'दिल से दिल तक' या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. यात तिने तेनी भानुशाली ही भूमिका साकारली होती. नेपोटिझमच्या मुद्यावर अभिनेत्री हिना खानने व्यक्त केलेल्या मताशी ती संपूर्णपणे असहमत आहे.
हिना खान म्हणाली होती, ''नेपोटिझम सगळीकडे आहे, तसाच तो आमच्या इंडस्ट्रीमध्येही आहे. तुम्ही जर स्टार असाल आणि तुमच्या मुलाला लॉन्च करायचे असेल तर त्यात काही अडचण असत नाही. परंतु तुम्ही जर बाहेरून आलेल्या लोकांना समान संधी देत नाही. टीव्ही कलाकार मुश्किलीनेच आपली जागा बनवू शकतात. कारण त्यांना चांगली संधी मिळत नाही. आम्हाला सिद्ध करण्यासाठी कमीत कमी आम्हाला संधी तर द्या.''