राजकुमार रावसोबत जमणार 'धडक गर्ल'ची जोडी, साकारणार दुहेरी भूमिका - Varun Sharma
'रुह-अफ्जा' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जान्हवी, राजकुमार राव व्यतीरिक्त वरुण शर्मादेखील भूमिका साकारणार आहे.
![राजकुमार रावसोबत जमणार 'धडक गर्ल'ची जोडी, साकारणार दुहेरी भूमिका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2842429-202-6ace0954-154c-44aa-8d79-16dd40217732.jpg)
मुंबई - अभिनेता राजकुमार रावने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. गेल्या वर्षी श्रद्धा कपूरसोबत तो 'स्त्री' चित्रपटात झळकला होता. हॉरर कॉमेडी असलेल्या 'स्त्री' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. आता पुन्हा एकदा तो, अशाच एका हॉरर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जान्हवी कपूरची वर्णी लागली आहे.
'रुह-अफ्जा' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात जान्हवी, राजकुमार राव व्यतीरिक्त वरुण शर्मादेखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर दुहेरी भूमिका साकारणार आहे.
'रुह-अफ्जा' या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्दिक मेहता करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान आणि मृगदीप सिंबा करणार आहेत. जून महिन्यात या चित्रपटाचे शुटींग सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. पुढील वर्षी २० मार्च २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'धडक' हा 'सैराट' चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटानंतर तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या. करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटातही ती महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच, वैमानिक गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित चित्रपटातही ती मुख्य भूमिका साकारणार आहे.