मुंबई- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याने प्रत्येक संवेदनशील मन व्यथित झाले. आपण वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचं दु:ख कमी नाही करू शकत तर निदान त्यांच्याबाबतीत संवेदनशील तरी राहू शकतो, या विचाराने मराठी सिने आणि नाट्य सृष्टीतील काही कलावंत मंडळींनी एकत्र येत वीरमरण आलेल्या जवानांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी‘जागते रहो’या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘दूर व मुक्त अध्ययन संस्था मुंबई विद्यापीठ’ व ‘प्रणाम भारत कला अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी२८ मार्चला सायंकाळी ५ वाजता मराठी भाषा भवन, मुंबई विद्यापीठ, कालिना सांताक्रुझयेथे हा कार्यक्रम होणार आहे. कृतज्ञतेसोबतच आजच्या तरूणाईच्या मनात‘नेशन फर्स्ट’म्हणजे नेमके काय व त्याबाबत जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम असणार आहे. केवळ मनोरंजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप नसून विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करत आपल्या सैन्य दलाची नव्याने ओळख घडवून देण्याचा हा प्रयत्न असेल.
या कार्यक्रमाविषयीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, सैन्याची मानसिकता नेमकी कशी असते हे दाखवतानाच प्रत्येकाने आपल्या कर्तव्याबाबत सजग राहणे ही तितकंच गरजेचं आहे. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या गोष्टी आपण अमलात आणू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
आपलं संपूर्ण जगणं व काम आपल्या राष्ट्राशी कशाप्रकारे निगडीत असू शकतं? तसेच आपली देशभक्ती केवळ जयघोषापुरती न राहता तिचा सखोल आणि सजग अर्थ समजून देत विचाराने प्रवृत्त करणारा हा कार्यक्रम असेल असं लेखक अभिराम भडकमकर यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनुराधाताई गोरे, अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या व्याख्यांनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाच सादरीकरण विनामूल्य करण्यात येणार आहे.