दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट असणारी मालिका सुंदरा मनामध्ये भरली प्रेक्षकांना भावतेय. यातील विजोड वाटणारी मुख्य जोडी, अभिमन्यू आणि लतिका, प्रेक्षकांचे मन जिंकतेय. क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप हे लतिका आणि अभिमन्युच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं असं म्हणायला हरकत नाही. अभिमन्यू आणि लतिकाच्या या प्रवासामध्ये अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले आणि आता प्रेक्षकांना दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट बघायला मिळते आहे. एका मुलाच्या जश्या जोडीदाराबाबत अपेक्षा असतात तश्याच मुलीच्या देखील असूच शकतात. अभिमन्यूला त्याची जोडीदार फिट हवी होती पण काही गोष्टी घडल्या आणि अभिमन्यू - लतिका लग्नबंधनात अडकले.
या प्रवासात अभिमन्यूचे लतिकाबाबतीतचे मत बदलायला हळूहळू सुरुवात झाली आणि तो तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला, ती जशी आहे तशी तिला त्याने स्वीकारले. कारण बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्वाचे हे त्याला उमगले आणि ही सुंदरा अभिच्या मनामध्ये भरली. आता अवघा महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत आहे ती मालिकेत घडणार आहे. ज्यामुळे लतिकाचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. कारण ज्या समाजाने तिला बेढब ठरवले, तिला हिणवले, तिला दूषणं लावली, तिला नकार दिला त्यांना लतिका दमदार उत्तरं देणार आहे.
आता “लतिका” देखील सौंदर्याच्या परिमाणात बसणारी मुलगी आहे हे ती पटवून देणार आहे. मालिकेत लवकरच शर्यत बघायला मिळणार आहे. लतिका बापूंच्या विरोधात जावून अभ्याच्या बाजूने मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून त्याची पहिल्यांदाच साथ देणार आहे. सगळ्यांना अभिमन्यू आता शर्यतीत हरला असं वाटतं असतानाच लतिका जोखड घेऊन शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. हे जोखड म्हणजे लतिकासाठी एखादी वस्तु नसून तिच्या आयुष्यात जे काही न्यूनगंड होते, तिचे समज होते, या सगळ्या गोष्टींचा भार असलेली ती वस्तु म्हणजे जोखड. लतिका असं समजून या शर्यतीत लतिका भाग घेणार आहे. लतिका ही शर्यत कोणाविरुध्द, कोणासाठी लढणार नसून पहिले ती ही शर्यत स्वत:साठी लढणार आहे. लतिकासाठी ही शर्यत समाज आणि त्यांचे विचार, न्यूनगंड यांच्या विरोधात आहे जी तिला जिंकायची आहे.