आपल्या देशात संगीताला खूप महत्व आहे. आपल्याकडे गाण्यातील चांगले-वाईट कळणारे असंख्य ‘कानसेन’ आहेत. थोडक्यात आपल्याकडे ‘औरंगझेब’ (ज्याला संगीताची चीड होती) जवळपास नाहीच आहेत असं म्हणायला जागा आहे. तसेच आपल्या विस्तीर्ण देशात अनेक सांगीतिक प्रतिभा देशाच्या कानाकोपऱ्यात सापडतात आणि अश्या लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून संगीत रियालिटी शो चा जन्म झाला. आधी अंताक्षरी स्वरूपात येणारे शोजचं रूपांतर गाण्याच्या शोज मध्ये झाले. आता जवळपास प्रत्येक भाषेमध्ये आणि प्रत्येक वाहिनीवर संगीत रियालिटी शो असतोच असतो.
‘इंडियन आयडॉल’ हा एक जागतिक सांगीतिक रियालिटी शो असून तो दीडेक दशकांपूर्वी भारतात आयात करण्यात आला आणि या हिंदी शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मराठी प्रेक्षक ‘इंडियन आयडॉल’ मराठीत कधी येणार याची सारखी विचारपूस करीत. आता त्यांची प्रतीक्षा संपणार असून ‘इंडियन आयडॉल मराठी’ हा रियालिटी शो येऊ घातलाय. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच 'इंडियन आयडॉल - मराठी' घेऊन येते आहे. 'इंडियन आयडॉल - मराठी'मुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल.