सध्या अनेक कारणांसाठी, त्यात उत्तम गायकीसुद्धा आली, गाजत असलेला इंडियन आयडॉल सिझन १२ हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे. या विकेंडला भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय गायिका आशा भोसले या मंचावर हजेरी लावणार आहे. ‘आशा भोसले’ स्पेशल भाग सादर होणार असून त्यात सर्व स्पर्धक आशाजींची अजरामर गाणी सादर करतील. या शोचे स्पर्धक, परीक्षक आणि प्रेक्षक यांना भारून टाकत संगीताची महाराणी खुद्द आशा भोसले या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. सर्वांनीच आशाजींचे आशीर्वाद मिळवले पण ‘देश की बेटी’ सायली कांबळेला आशाजींकडून एक मौल्यवान क्षण मिळाला.
आपल्या आदर्श व्यक्तींची स्मृती आपल्याजवळ ठेवण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी त्यांचे फोटो ठेवते तर कोणी स्वाक्षरी. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या आगामी भागात या संदर्भात एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली. सायलीने ‘दैया ये मैं कहां आ फंसी’, ‘खतूबा’ आणि ‘हंगामा हो गया’ ही गाणी दमदारपणे सादर केल्यावर तिला आशाजींनी कौतुकाच्या रूपात आशीर्वाद दिले. ‘दैया ये मैं कहां आ फंसी’ गाणे गायला किती कठीण आहे हे आशाजींनी नमूद केले आणि त्याच वेळी सायलीने ते छान निभावले असेही सांगितल्यावर सायलीला आकाश ठेंगणे वाटले.
सायली सर्व प्रकारची गाणी गाते परंतु तिची आशा भोसलेची गाणी हातखंडा आहेत. आशाजी हा सायलीचा आदर्श, तिचे दैवत आहेत आणि त्यांचा वरदहस्त आपल्यावर सदैव असावा ही तिची इच्छा आहे. आशाजींच्या हातांचे ठसे घेऊन ते आपल्या घरी देव्हार्याच्या शेजारी ठेवण्याची आपली इच्छा तिने बोलून दाखवली. ‘देश की बेटी’ सायलीची ही इच्छा आशाजींनी आनंदाने पूर्ण केली. आपले दैवत असलेल्या आशा भोसलेच्या हातांचे ठसे मिळाल्यावर सायलीचा उर भरून आला.