गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतचे संशयास्पद निधन झाले आणि बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली. ती आत्महत्या होती की हत्या होती यावर अनेक तर्कवितर्क करण्यात येत होते आणि शेवटी ती केस सीबीआयकडे सोपविण्यात आली असून अजूनही त्याबद्दल काहीही निर्णय झालेला नाहीये. सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मनोरंजनसृष्टीत अल्पावधीतच भरपूर प्रसिद्धी मिळविली होती आणि नंतर काही वर्षांनी सर्वात लोकप्रिय असलेली ती मालिका सोडून चित्रपटांकडे मोर्चा वळविला होता. त्यात त्याला यशही मिळाले कारण ‘काय पो छे’ पासून सुरुवात झालेली त्याची कारकीर्द उत्तम चालली होती. परंतु काळाने त्याच्यावर अकाली झडप घातली आणि तो अनंतात विलीन झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची एके काळची प्रेयसी अंकिता लोखंडे बरीच लाइमलाईटमध्ये आली.
खरंतर, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेची लोकप्रियता गगनाला भिडत होती आणि त्याच मालिकेमुळे अंकिता लोखंडे छोट्या पडद्यावरील खूप मोठी स्टार बनली होती. सुशांत बरोबर तिची पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातही जोडी जमली होती आणि ती जोडीसुद्धा खूप लोकप्रिय झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते आणि एका डान्स रियालिटी शोमध्ये सुशांतने अंकिताला लग्नाची मागणी घातली होती व तिनेही होकार दिला होता. सुशांत मोठा स्टार बनत होता त्यामुळेच लग्न करायचे आहे आणि सुशांत बरोबर संसार थाटायचा आहे म्हणून अंकिताने आपल्या करियरला रामराम केला होता. ते एकत्र ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. परंतु चांगल्या गोष्टींना नजर लागते म्हणतात तशी त्यांच्या नात्याला नजर लागली आणि ते वेगळे झाले. यामुळेच सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रेस जगताने तिला अनेक गोष्टी विचारल्या होत्या आणि तिनेही निर्भीडपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. ‘सुशांतचे भविष्यासाठी अनेक प्लॅन्स होते आणि तो आत्महत्या करूच शकत नाही’ हे तिचे स्टेटमेंट मीडियाने उचलून धरले होते. सोशल मीडियातूनही अंकिताला खूप सपोर्ट मिळत होता आणि त्यावर उलटसुलट चर्वितचर्वण होत होते. अलीकडच्या काळात तिच्या खाजगी जीवनात ती आनंदी दिसल्यामुळे त्याच सोशल मीडियाने ‘तू सुशांत ला विसरलीस’ वगैरे म्हणत तिला ट्रोल केले होते.
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो ‘बिग बॉस’ हा त्यात होणाऱ्या भांडणांमुळे आणि कॉंट्रोव्हर्सीज मुळे लोकप्रिय आहे. त्याचे मेकर्स या शोसाठी नजीकच्या काळात ‘कॉंट्रोव्हर्सी करून लाइमलाईट’ मध्ये आलेल्या सेलिब्रिटीजना या शोचा भाग करून घेतात. यावर्षीही ‘बिग बॉस’चा नवीन सिझन येऊ घातलाय आणि त्यात कोण कोण असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चाही सुरु असून त्यात मीडिया मीठमसाला टाकतेय. गेल्या वर्षी ‘लाइमलाईट’ मध्ये असलेली अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’चा हिस्सा होणार आहे असे चर्चिले जाऊ लागले आणि सुशांतला न विसरलेले तिला सोशल मीडियावर ट्रोल करू लागले. तिला हे समजल्यावर अंकिताने सोशल मीडिया वरून सर्वांना कळविले की ती ‘त्या’ शो चा हिस्सा नाही आणि होणार देखील नाहीये.