रायगड -आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने कलाविश्वातील कलाकारही महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत आहेत. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशननेही आपल्या कुटुंबीयांसोबत पेण तालुक्यातील आपटे फाटा येथे जाऊन शंकराचे दर्शन घेतले. यावेळी त्याच्यासोबत त्याची एक्स पत्नी सुझान, मुले हृदान आणि रेहान, वडील राकेश रोशन आणि आई पिंकी रोशन तसेच त्याची बहीण सुनैना रोशनचीही उपस्थिती होती.
हृतिक आणि सुझानने यावेळी महादेवाची पूजा केली. तसेच आरती केली. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा -'कामयाब' चित्रपटाच्या ट्रेलरवर अजय देवगने दिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ
यावेळी हृतिक रोशन आणि राकेश रोशन याना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तर त्याचे फोटो घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. रोशन कुटुंबाचे आपटा फाटा याठिकाणी फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये हृतिक रोशन यांच्या आजोबांनी शंकराचे मंदिर बांधले आहे. दर महाशिवरात्रीला याठिकाणी शंकराचा उत्सव साजरा केला जातो. मोठ्या संख्येने भाविक शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, हृतिक मागच्या वर्षी 'वॉर' चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले आहेत. लवकरच तो त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करणार आहे. त्याच्या 'क्रिश ४' या चित्रपटाचीही सध्या तयारी सुरू आहे.
हेही वाचा -'कुली नंबर वन'चे शूटिंग पूर्ण, वरुण धवनने 'असं' केलं सेलिब्रेशन