मुंबई: अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मिर्झापूर या वेब सिरीजमुळे बदनामी झाल्याचा आरोप हिंदीतील नामवंत लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी केला आहे. मालिकेच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांच्या 'धब्बा' या कादंबरीतील वाक्य अश्लील पध्दतीने दाखवल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या मालिकेतील अभिनेता कुलभूषण खरबंदा साकारत असलेले सत्यनंद त्रिपाठी ही व्यक्तीरेखा पाठक यांची 'धब्बा' ही कादंबरी वाचत असल्याचे एक दृष्य आहे. त्यानंतर ते या पुस्तकातील एक वाक्य वाचून दाखवत असल्याचे दिसते. त्यामध्ये ते वाक्य अश्लील आहे. मात्र असे वाक्यच कादंबरीत नसल्याचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांचे मत आहे.
सुरेंद्र मोहन पाठक यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रात दावा केला आहे की, 'धब्बा' वाचताना मालिकेत दाखविलेल्या पात्राचा मूळ मजकुराशी काही संबंध नाही. " त्यांनी लिहिलंय, "उलटपक्षी जे वाचले जात आहे ते अगदी अश्लील आहे, परंतु लेखक ते लिहिण्याचा विचार करू शकत नाहीत. परंतु या सिरीजमध्ये असे दाखवण्यात आले आहे की ते माझ्या 'धब्बा' कादंबरीतून वाचले जात आहे जे चुकीचे उदाहरण आहे.
पाठकांचा असा आरोप आहे की अशी चुकीची माहिती देणे म्हणजे 'पाच दशकांहून अधिक काळातील माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न' आहे.
मिर्झापूर 2 वेब सिरीजचे 10 भाग आहेत. यात अली फजल, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, रसिका दुग्गल आणि हर्षिता गौर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.