मुंबई -बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाने चाहत्यांवर छाप पाडणारा हिमेश रेशमिया अभिनय क्षेत्रातही सक्रिय झाला आहे. हिमेशने आत्तापर्यंत दोन-तीन चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसे पाहिले तर त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर वाव मिळाला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा तो पंजाबी कथेवर आधारित असलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
'हॅप्पी हार्डी अँड हीर', असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात हिमेशसोबत पंजाबी अभिनेत्री सोनिया मान ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रे्लर ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. तर, चित्रपट सप्टेंबर महिन्यात सिनेमागृहात झळकेल.
या चित्रपटाच्या टीजरमध्ये हिमेश आणि सोनिया मान यांची झलक पाहायला मिळते. यामधील गाणी हिमेशनेच गायली आहेत. तर, एक गाणे अरिजीत सिंगच्या आवाजातही असणार आहे. त्याच्या आवाजाची जादु पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. अरिजीत आणि हिमेश यांच्या आवाजातील गाण्यांसाठी चाहते या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळतेय.
राका यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या टीजरवरुन या चित्रपटाची कथा ही त्रिकोणी प्रेमकथा असल्याचा अंदाज येतो. तसेच, हिमेशची या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिका असणार आहे. तसेच या चित्रपटात ८ गाण्यांचा समावेश राहणार आहे. ही गाणी हिमेशसोबत अरजीत सिंग, श्रेया घोषाल आणि जुबीन नौटीयाल यांच्या आवाजातील असणार आहेत.