लॉकडाऊनचा प्रदीर्घ काळ घालवल्यानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकांच्या शुटिंगला मुंबईत सुरूवात व्हायला लागली आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार सर्व निकष पाळून ही शूटिंग सुरू झाली आहेत.
पुन्हा सेटवर जायला मिळत असल्याने कालाकार मंडळी कमालीची खुश आहेत. तर पौराणिक मालिका आणि रिपीट एपिसोडच्या माऱ्यातून सुटका होणार असल्यानेही प्रेक्षकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
पुन्हा भरली ‘हास्याची जत्रा’
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे चित्रीकरण आजपासून मुंबईत सुरु झाले आहे. चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. सेट वर अॅम्ब्युलन्सपासून डॉक्टर नर्सपर्यंत सर्व सुविधा आहेत. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सेटवर प्रत्येकाचं चेकअप केलं जात. हास्यजत्रेचे परीक्षक असणारे सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक हे सुद्धा चित्रीकरणास उपस्थित होते.
समीर चौगुलेने गणेश पूजा करून चित्रीकरणाला सुरुवात झाली. आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांचा आवडता कार्यक्रम आणि त्यांचे लाडके विनोदवीर प्रसाद-नम्रता, समीर विशाखा, गौरव-वनिता यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं असलं तरीही प्रत्यक्ष नवीन एपिसोड पाहण्यासाठी १० जुलै उजाडण्याची शक्यता आहे.
कोठारेंनी पुन्हा घेतला ‘प्रेम पॉयझन पंगा’
झी युवा वाहिनीवरील प्रेम पॉयझन पंगा या मालिकेच्या शूटिंगला नुकतीच मुंबईत पुन्हा सुरूवात झाली. या मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांनी स्वतः उपस्थित राहून क्लॅप देत या मालिकेच्या चित्रीकरणाचा पुनः श्च हरिओम केला.