‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला ‘गर्लफ्रेंड’ भेटायला येतेय शेमारू मराठीबाणावर! - 'गर्लफ्रेंड'चा १४ फेब्रुवारीला होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शेमारू मराठीबाणावर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला होणार आहे. बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणून ओळखली जाणारी मराठीतील सुपरस्टार सई ताम्हणकरने हा सिनेमा शेमारू मराठीबाणावर दाखवला जाणार असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई - मराठी मनोरंजनाची कास धरणाऱ्या शेमारू मराठीबाणावर प्रेक्षकांना भेटायला 'गर्लफ्रेंड' येणार आहे. थोडक्यात ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शेमारू मराठीबाणावर ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला होणार असून या निमित्ताने जगावेगळ्या लव्हस्टोरीचा आनंद घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘व्हॅलेंटाईन्स डे’ च्या निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या रोमांचक सिनेमांच्या यादीतील सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमा. १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता 'गर्लफ्रेंड' शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर दाखविला जाणार असून 'प्यारवाली लव्ह स्टोरी', 'बस स्टॉप', 'फोटोकॉपी', 'यंटम', 'लग्न मुबारक', 'मितवा' आणि अशा अनेक मनोरंजक चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना सहकुटुंब घेता येणार आहे.
प्रत्येकालाच आपल्याला एखादी तरी गर्लफ्रेंड असावी ही मनीषा असते. त्याचप्रमाणे गर्लफ्रेंड मिळवण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या नचिकेतच्या आयुष्यात गर्लफ्रेंड नसणे हा सर्वात ऐरणीचा मुद्दा ठरलाय. यावर तो एक नामी युक्ती करतो, अलिशा नावाची सुंदर तरुणी आपली गर्लफ्रेंड असल्याची बतावणी तो करू लागतो. नचिकेतला एरव्ही ज्याचे खूप आकर्षण वाटत असते तो परिकथेतील रोमान्स त्याच्या जीवनात प्रत्यक्ष येतो तेव्हा मात्र त्याची अवस्था बिकट होऊन जाते. नचिकेतला त्याच्या स्वप्नांची राणी खरोखरीच मिळणार की त्याच्या एरव्ही सुरळीत चाललेल्या साध्या आयुष्यात वादळ निर्माण होणार? या आगळ्यावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चे नेमके काय होणार हे शेमारू मराठीबाणावर पाहायला मिळणार आहे.
बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणून ओळखली जाणारी मराठीतील सुपरस्टार सई ताम्हणकरने हा सिनेमा शेमारू मराठीबाणावर दाखवला जाणार असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, "गर्लफ्रेंड हा सिनेमा माझ्यासाठी अतिशय जवळचा आहे. या सिनेमाच्या सेटवर प्रेम, आपलेपणा आणि मौजमजा यांची भरपूर रेलचेल होती. यंदा व्हॅलेंटाइन्स डे ला याचा प्रीमियर होत आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. मला खात्री आहे की दर्शकांना देखील हा सिनेमा खूप आनंद मिळवून देईल."
लोकप्रिय आणि गुणी अभिनेता अमेय वाघने सांगितले, "गर्लफ्रेंड हा असा सिनेमा आहे ज्यातील भूमिका साकारताना माझ्यातील अभिनेत्याचा कस लागला. थिएटर्समध्ये दर्शकांनी या सिनेमाला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे ही मेहनत सार्थकी लागली. टीव्हीवरील आमच्या दर्शकांसाठी शेमारू मराठीबाणाने गर्लफ्रेंडचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आयोजित केला आहे हे ऐकून मला खूपच छान वाटले. माझी पक्की खात्री आहे की या गर्लफ्रेंडसोबत माझा आणि माझ्या दर्शकांचा व्हॅलेंटाइन्स डे मस्त मजेत जाईल."
व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सिनेमा बघायचा झाल्यास, आपल्या दर्शकांसाठी सिनेमांची निवड नेहमीच अतिशय चोखंदळपणे करणारी, शेमारू मराठीबाणा वाहिनी वर पहा ‘गर्लफ्रेंड’.